राज्यभरात पुढील ४ दिवस पावसाचे; अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झाला असून तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यभर पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : गेले काही दिवस संपूर्ण राज्यभर पावसाने उघडीप दिली असली तरी शुक्रवारपासून पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे. राज्यभरात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे असतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झाला असून तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यभर पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

ऑगस्टअखेरीस पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढल्यानंतर अनंत चतुर्दशीनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसात विविध जिल्ह्यांना हायअलर्ट जारी केला आहे. सातारा, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच बहुतांश मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम राहणार आहे.

अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. तसेच बंगालच्या उपसागरातही पूर्व मध्यभागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. १२ सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून विदर्भ, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच संपूर्ण विदर्भात शनिवारपासून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढेल, तर उर्वरित भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in