
पुणे : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन आठवडे जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाची सरासरीपेक्षा अधिक तीव्रता नोंदवली गेली असून, काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अंदाजानुसार, २१ सप्टेंबरपर्यंत राज्यात कमी-जास्त प्रमाणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाचा पुढील १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान तळकोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थोडा अधिक पाऊस राहू शकतो. २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता इतर भागांमध्ये जोरदार पाऊस; विशेषतः कोकण किनारपट्टीवर सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारनंतर पुण्याला पावसाने पुन्हा झोडपले. दिवस ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढल्याने पुणेकरांची दैना उडाली. सखल भागात पाणी साठले. हवामान विभाग नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे, तसेच पावसाळी वाहतुकीमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
पुढील चार दिवस राज्यात यलो अलर्ट
शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा काही भाग, उत्तर विदर्भाचा काही भाग, शनिवारी, रविवारी सोलापूर, दक्षिण मराठवाडामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.