‘रेड अलर्ट’नंतर पाऊसच गायब! आज पुन्हा मुसळधारचा इशारा; मुंबईत 'ऑरेंज', तर 'या' जिल्ह्यांना 'रेड' व 'येलो' अलर्ट जारी

मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली होती. मात्र ‘रेड अलर्ट’नंतर पाऊसच गायब झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. मात्र...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मुंबई : मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली होती. मात्र ‘रेड अलर्ट’नंतर पाऊसच गायब झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. फक्त तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने मुंबई, उपनगरातून दडी मारल्याचे चित्र होते. दरम्यान, शुक्रवारी राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईत आजही मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आयएमडीने नाशिकसाठी रेड अलर्ट आणि पालघर, पुणे, नंदुरबार आणि धुळेसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी पालघर, नाशिक, धूळे, नंदूरबार जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्याचप्रमाणे ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने गुरुवारी वर्तविलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत मुंबईच्या काही भागांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. दुपार आणि संध्याकाळनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतील.

त्याआधी, बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मुंबई शहरात ११७.१८ मिमी, पूर्व उपनगरात १७०.५८ मिमी आणि पश्चिम उपनगरात १०८.७५ मिमी इतका जोरदार पाऊस झाल्याची नोंद पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रांवर झाली आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथे २४ तासांत १६९.२ मिमी, तर सांताक्रुझमध्ये १७०.३ मिमी पाऊस झाला. मुंबईत यंदा २५ सप्टेंबरपर्यंत कुलाब्यात २५५९ मिमी आणि सांताक्रुझ येथे २९४२ मिमी इतका एकूण पाऊस झाला आहे. तो वार्षिक सरासरीच्या अनुक्रमे १०५ आणि ११३ टक्के आहे.

बुधवारी मुसळधार बरसलेल्या पावसामुळे मुंबईसह उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर तसेच पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले होते. विशेष म्हणजे, पावसाचा जोर ओसरल्यानंतरही पाण्याचा निचरा होत नव्हता. रस्ते, रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने मुंबईची वाहतूक सेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेच्या शेकडो फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. रात्री १ वाजल्यानंतर रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली. त्यामुळे बुधवारी कामावरून घरी निघालेल्या कर्मचाऱ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याने, कर्मचाऱ्यांनी सावधगिरी बाळगत कामाला दांडी मारणे पसंत केले.

मुंबईत गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत पावसाचा ‘रेड अलर्ट’ असल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र काही ठिकाणी तुरळक सरी वगळता गुरुवारी पावसाने उसंत घेतली.

अंधेरीत गटारात पडून महिलेचा मृत्यू

मुंबईत बुधवारी सायंकाळनंतर झालेल्या तुफानी पावसात अंधेरी पूर्व येथे उघड्या गटारात पडून एका महिलेचा मृत्यू झाला, तर पडझडीच्या दुर्घटनांमध्ये चार जण जखमी झाले. या घटनेची महापालिकेकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

अंधेरी पूर्व एमआयडीसीमधील सिप्झ गेट नंबर-८ येथे जलाशय इमारतीनजीक एक महिला पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारात पडली. या ठिकाणी भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. रात्री नऊच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षातून अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने तेथे धाव घेऊन या महिलेला गटारातून बाहेर काढले. या ४५ वर्षीय महिलेला कूपर रुग्णालयामध्ये नेण्यात आले, परंतु तिचा आधीच मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी जाहीर केले. मृत महिलेचे नाव विमल अनिल गायकवाड असे आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच त्यासाठी तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी समितीदेखील नियुक्त करण्यात आली आहे. चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून परिमंडळ-३ चे उपआयुक्त देवीदास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ हे समितीचे उर्वरित दोन सदस्य आहेत.

पडझडीच्या घटनांत चार जण जखमी

बुधवारी रात्री जोरदार पावसात शहरात एका ठिकाणी, पूर्व उपनगरात सात ठिकाणी आणि पश्चिम उपनगरात एका ठिकाणी अशा एकूण १० ठिकाणी घराच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. भांडूप पश्चिमेला तुळशीपाडा येथे पाईपलाईन रोडवर गायत्री विद्या मंदिराजवळ चाळीतील एका घराच्या भिंतीचा काही भाग कोसळला, तिथे चार जण अडकले होते. त्यांची अग्निशमन दलाने सुटका केली. यापैकी एकजण सुस्थितीत होता, तर जखमी झालेल्या सुरेंद्र पाटोळे (५६) , शीला पाटोळे (४५) आणि क्रांती पाटोळे (२६) यांच्यावर सिद्धी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याशिवाय भांडूप पश्चिमेलाच हनुमान नगर खदान, शिंदे मैदान येथे डोंगराचा काही भाग खाली येऊन माधुरी शर्मा (४३) ही महिला जखमी झाली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून तेथील तीन घरे खाली करण्यात आली आहेत. या महिलेवर मुलुंडच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला कांदिवलीतील रुग्णालयात हलविण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.

मध्य रेल्वेच्या १०० लोकल फेऱ्या रद्द

बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा बोजवारा उडाला. रात्री एक तास धीम्या मार्गावरील लोकल ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रथम मुख्य मार्ग आणि त्यानंतर हार्बर मार्ग ठप्प झाल्याने प्रवाशांना प्रवासासाठी सव्वाचार तास लोकलमध्ये बसून राहावे लागले. लोकल सेवा ठप्प झाल्याने दोन्ही मार्गावरील तब्बल १०० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. मेल, एक्स्प्रेसचे वेळापत्रक बिघडल्याने गुरुवारीही लोकल सेवेवर परिणाम झाला.

logo
marathi.freepressjournal.in