Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून, आजपासून येते चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून, आजपासून येते चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आजपासून पुढील चार दिवस कोकण, घाटमाथा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.

कोकणातील सर्व जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्हे वगळता नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता विभागाने वर्तवली आहे. कोकणातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भात सर्व जिल्ह्यात विजा आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी संपूर्ण कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्याचा घाटमाथ्यावर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि जालना, परभणी, बीड, धाराशिव जिल्ह्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

सोमवारी संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मंगळवारपासून राज्यात बहुतांश भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in