हारून शेख/लासलगाव
चीनमधून भारतात विशेषतः महाराष्ट्रात होत असलेल्या निकृष्ट व बेकायदेशीर बेदाण्यांच्या आयातीमुळे मनुक्यांचे दर मोठ्या प्रमाणात कोसळत असून स्थानिक मनुका उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
सध्या स्थानिक मनुक्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी घटले असून, बेदाणा उत्पादकांनी यंदा कष्टाने घेतलेले उत्पादन गोदामात पडून असल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहेत.
नाशिक जिल्ह्यात निफाड, दिंडोरी आणि येवला तालुक्यातील अनेक द्राक्ष उत्पादकांनी बेदाणे तयार करताना मोठा खर्च केला. मात्र, बाजारात चिनी बेदाणे स्वस्त दराने उपलब्ध होत असल्याने स्थानिक बेदाण्याला मागणी मिळत नाही. यामुळे अनेकांना त्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्याचीही शाश्वती उरलेली नाही. बेदाण्याला किमान ५० ते ७० हजार रुपये प्रति टन उत्पादन खर्च येतो. मात्र, बाजारात चिनी बेदाणा आल्याने भारतीय बेदाण्याला ८० ते ९० रुपये किलोपेक्षा जास्त दर मिळत नाही. चिनी माल स्वस्त असल्याने भारतीय मालाचा उठाव कमी झाल्याने बेदाणा उत्पादक अडचणीत आले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या निदर्शनानंतर ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून तातडीने चिनी बेदाण्यांच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे, मात्र आता उशीर झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेदाण्यावर तातडीने आयातबंदी लावावी, देशांतर्गत बेदाण्यांना हमी भावाचा आधार द्यावा, निर्यात धोरणात स्थानिक बेदाण्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी बेदाणा उत्पादकांकडून केली जात आहे. राज्य द्राक्ष उत्पादक संघाने यासाठी केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली असून, देशांतर्गत बेदाण्यांना संरक्षण मिळावे यासाठी ‘किमान आयात किंमत’ लागू करावी, अशी मागणी केली आहे.
यासाठी आयातबंदीची मागणी
निकृष्ट दर्जाचे बेदाणे : चिनी बेदाणे अनेक वेळा अन्न सुरक्षा मानकांवर अपयशी ठरतात.
करचुकवेगिरी : अनेक वेळा हाँगकाँग किंवा तिसऱ्या देशांमार्फत चिनी माल स्वस्तात भारतात दाखल होतो.
दर्जा आणि सुरक्षिततेचा प्रश्न : स्थानिक बेदाणे अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुरक्षित असले तरी किमतीच्या स्पर्धेत मागे पडत आहेत.
या आयातीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होतेच, पण कर चुकवून येणाऱ्या मालामुळे देशाच्या महसुलालाही मोठा फटका बसतो. तसेच शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. बेकायदेशीर व्यापारावर कठोर कारवाई करून या बेकायदेशीर आयातीवर तातडीने बंदी घालावी व स्थानिक उत्पादकांना दिलासा द्यावा.
वाल्मिक सांगळे, संचालक (महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघ)