महसूल विभागासाठी मंत्रालयात अद्ययावत वॉर रुम; राज्य सरकार अडीच कोटी रुपये खर्च करणार

राज्याचा महसूल विभाग हा थेट जनतेशी जोडला गेला आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती राज्यातील जनतेला मिळावी त्या योजनेचा लाभ जनतेला मिळावा यासाठी राज्य सरकारने मंत्रालयात अद्ययावत वॉर रुम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूल विभागासाठी मंत्रालयात अद्ययावत वॉर रुम; राज्य सरकार अडीच कोटी रुपये खर्च करणार
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्याचा महसूल विभाग हा थेट जनतेशी जोडला गेला आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती राज्यातील जनतेला मिळावी त्या योजनेचा लाभ जनतेला मिळावा यासाठी राज्य सरकारने मंत्रालयात अद्ययावत वॉर रुम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २ कोटी ५० लाख रुपये खर्चास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनातील प्रमुख विभाग असून समाजातील सर्व स्तरातील लोकांचा दैनंदिन कामकाजासाठी या विभागाशी संबंध येतो. त्यामुळे महसूल विभाग, जमा बंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख विभाग व नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे या उप विभागांमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येतात. लोककल्याणकारी योजना, शासनाचे विविध अभिनव उपक्रम व अभियान, मोहिमा आणि निरनिराळ्या लोकोपयोगी कार्यक्रमांची माहिती व लाभ जन सामान्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी विविध माध्यमांचा व समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून महसूल विभाग व त्याच्या उपविभागांच्या योजनांना प्रसिद्धी देणे, महसूल विभागाची वेबसाइट अद्ययावत ठेवणे यासाठी मंत्रालयात सुसज्ज "वॉर रुम" स्थापन करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिनाभरापूर्व दिले होते.

या वॉर रूमच्या माध्यमातून महसूल विभागाच्या तीनही घटकांमधील कार्याची माहिती एकत्रित स्वरूपात प्रभावीपणे समाज माध्यमांद्वारे व इतर दळणवळणाच्या साधनांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वॉर रूमची स्थापना करणे मुख्य उद्दिष्ट आहे. याबाबत नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

असे होणार काम

  • महसूल व उप विभागांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे

  • वेबसाइट अद्ययावत ठेवणे

  • धोरणांची माहिती सुलभपणे उपलब्ध करून देणे

  • मोहिमा व उपक्रमांचे प्रभावी संप्रेषण, फीडबॅक संकलन आणि विश्लेषण करणे

logo
marathi.freepressjournal.in