शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला राज्य सरकारने दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीबाबत सुधारित योजना राज्य सरकारने लागू केली आहे. शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबातील पात्र सदस्याला गट-क अथवा गट-ड संवर्गातील मंजूर व रिक्त पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला राज्य सरकारने दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीबाबत सुधारित योजना राज्य सरकारने लागू केली आहे. शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबातील पात्र सदस्याला गट-क अथवा गट-ड संवर्गातील मंजूर व रिक्त पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे.

अनुकंपा नियुक्तीसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. नियुक्ती देताना संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक, व्यावसायिक व तांत्रिक पात्रता बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार गट-क संवर्गातील पदांसाठी सेवाप्रवेश नियमांनुसार पात्रता पूर्ण करणे आवश्यक असेल. मात्र, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती शैक्षणिक पात्रता पूर्ण करत नसल्यास गट-ड संवर्गातील पदासाठी शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल करण्यात येणार आहे. ही सवलत केवळ पती किंवा पत्नीसाठीच मर्यादित राहणार आहे. ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

विलंब किंवा नियमबाह्य नियुक्ती केल्यास कारवाई

अनुकंपा नियुक्ती ही वारसा हक्क नसून प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठता, पात्रता आणि रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसारच नियुक्ती देण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापनाने थेट नियुक्ती न करता सक्षम प्राधिकरणाच्या शिफारशीनुसारच नियुक्ती द्यावी लागणार असून विलंब किंवा नियमबाह्य नियुक्ती केल्यास संबंधित व्यवस्थापनावर कारवाई करण्याचा इशाराही शासनाने दिला आहे.

अनुकंपा नियुक्तीसाठी नियम

  • वयोमर्यादा : १८ ते ४५ वर्षे

  • नियुक्ती : मंजूर, रिक्त गट-क / गट-ड पदांवरच

  • पात्रता : गट-क साठी सेवाप्रवेश नियम लागू

  • सवलत : पती/पत्नीस गट-ड मध्ये शैक्षणिक अहर्ता शिथिल

  • अपात्रता : पती/पत्नी शासकीय सेवेत असल्यास लाभ नाही

  • निर्बंध : ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असल्यास अपात्र

logo
marathi.freepressjournal.in