
भिवंडी : महावितरणच्या ग्राहकांसाठी वीज दरात सुधारणा करत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने १ जुलैपासून नवीन दर लागू करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयाची माहिती टोरंट पॉवर या खासगी वीज वितरण कंपनीने रविवारी दिली आहे. सुधारित दरानुसार, दरमहा ० ते १०० युनिट्स वीज वापरणाऱ्या निवासी ग्राहकांसाठी सुमारे ९ टक्के दर कपात लागू करण्यात आली असून १०० युनिट्सपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ०.५ टक्के ते ३ टक्क्यांपर्यंत किरकोळ दरवाढ भोगावी लागणार आहे. औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांच्या बाबतीत फिक्स्ड चार्जमध्ये ४.५ टक्क्यांनी वाढ होणार असून ऊर्जा शुल्कात काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे. व्हीलिंग चार्जमध्ये वाढ होऊन तो आता प्रति युनिट १.१७ रुपयावरून १.४७ रुपये इतका झाला आहे.
१ जुलैपासून २० किलोवॅटपेक्षा अधिक लोड असलेल्या सर्व लो टेन्शन (LT) औद्योगिक, व्यावसायिक व सार्वजनिक सेवा ग्राहकांना केव्हीएएच (kVAh) वापरावर आधारित बिल आकारले जाणार आहे. विशेष म्हणजे ऊर्जा शुल्क आता किलोवॅट अवर (kWh) ऐवजी केव्हीएएच (kVAh) युनिट्सवर लागू होईल. त्याचप्रमाणे फिक्स्ड किंवा डिमांड चार्जेसही किलोवॅट (kW) ऐवजी केव्हीए (kVA) डिमांडवर आधारित असतील.
उच्चदाब (HT) ग्राहक, लो टेन्शन औद्योगिक, पॉवरलूम, व्यावसायिक, सार्वजनिक सेवा (१० किलोवॅटपेक्षा जास्त लोड) तसेच १० किलोवॅटपेक्षा कमी लोड असलेल्या औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांसाठी पर्यायी स्वरूपात टाइम ऑफ डे (ToD) दर रचनेतही बदल करण्यात आले आहेत. सौर वेळ म्हणजे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान वीज वापरावर १५ टक्के व ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत २५ टक्के ऊर्जा शुल्क सवलत देण्यात येईल. संध्याकाळी ५ ते रात्री १२ या कमाल (पीक) वेळेत औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना २५ टक्के व इतर ग्राहकांना २० टक्के अधिभार आकारला जाणार आहे. दरम्यान, सुधारित दररचना लागू होत असताना सुरुवातीच्या ३ ते ६ महिन्यांच्या कालावधीत प्रणाली व मीटर अपग्रेड प्रक्रियेदरम्यान संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वीज वापरासाठी १.३० रुपये प्रति युनिट अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. बदलांची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी टोरंट पावरने ग्राहकांना वरील सर्व बाबींची योग्य माहिती घेऊन वीज वापर नियोजनपूर्वक करण्याचे आवाहन केले असून अधिक माहितीसाठी ग्राहकांनी टोरंट पावरच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.