

ठाणे : सीएनजी दरवाढ, रिक्षा भाडेवाढ आणि बेकायदा बाइक टॅक्सींचा वाढता सुळसुळाट यांसह विविध प्रलंबित प्रश्नांवरून १ डिसेंबरपासून पुकारण्यात आलेला रिक्षा-टॅक्सीचालकांचा राज्यव्यापी संप अखेर महिनाभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर शुक्रवारी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या बैठकीत अकरापैकी आठ मागण्या मान्य करण्यात आल्या.
उर्वरित तीन मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी नागपूर येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, महिनाभरात निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या विविध प्रश्नांवर सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने संघटनांनी १ डिसेंबरपासून राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. सीएनजीच्या वाढत्या किमती, अपुरे उत्पन्न, भाडेवाढीचा प्रश्न आणि बेकायदा बाइक टॅक्सींची वाढती संख्या यामुळे चालकांमध्ये नाराजी होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सरनाईक यांनी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत चालकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात आला.
अकरापैकी आठ मागण्यांवर परिवहन विभागाने निर्णय घेतला असून, उर्वरित तीन मागण्या केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने त्यासाठी केंद्रीय स्तरावर चर्चा आवश्यक असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बैठक घेण्याचे नियोजन आहे.
यासाठी सरनाईक गडकरी यांना पत्र देणार असून, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांचाही बैठकीत सहभाग असेल.
बेकायदा बाइक टॅक्सींच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. या संदर्भात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात आरटीओ अधिकारी आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
महिनाभराची मुदत; अन्यथा आंदोलन
कृती समितीचे नेते जितेंद्र कुमार इंदिसे यांनी बैठकीनंतर संप स्थगित करण्याची घोषणा केली. आठ मागण्या मान्य झाल्याने आणि उर्वरित मागण्यांवर चर्चेचे आश्वासन मिळाल्याने १ डिसेंबरपासूनचे आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत सकारात्मक निर्णय न झाल्यास रिक्षा-टॅक्सीचालकांचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.