‘ॲक्शनला रिअ‍ॅक्शन तर मिळणारच!’ संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाण यांना थेट इशारा

रवींद्र चव्हाण मर्जीने वागत असून ॲक्शनला रिअ‍ॅक्शन मिळणारच, असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिला आहे.
‘ॲक्शनला रिअ‍ॅक्शन तर मिळणारच!’ संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाण यांना थेट इशारा
Published on

मुंबई : रवींद्र चव्हाण मर्जीने वागत असून ॲक्शनला रिअ‍ॅक्शन मिळणारच, असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिला आहे. रवींद्र चव्हाण यांनी फक्त मुंबई आणि ठाण्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र फिरला पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटना मजबूत करावी. फडणवीसांचे ऐकायचे नसेल, तर तसे स्पष्ट सांगावे. पक्षवाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले असतील, मात्र यापुढच्या निवडणुका भाजपमध्ये असताना एकट्याने लढण्याची वेळ येऊ शकते, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

निवडणुकीपूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये आचारसंहिता ठरलेली होती. मात्र प्रत्यक्षात आपापसातील नेते पळवणे, स्थानिक पातळीवर गोंधळ आणि प्रत्येक ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार अशीच स्थिती पाहायला मिळाली, असा आरोप त्यांनी केला. ही लढाई जनतेसाठी नव्हे, तर राजकीय अस्तित्वासाठी होती. वाद टोकाला गेला होता. अनेक ठिकाणी विरोधक निवडणूक लढवण्याच्याच मनःस्थितीत नव्हते. ठाकरे यांच्या शिवसेनेने कुठेही जोरदार प्रचार केला नाही, तरीही सत्ताधाऱ्यांमध्येच अंतर्गत वाद उफाळून येत होता, असेही शिरसाट म्हणाले. अशा वातावरणात यापुढे छोट्या निवडणुकांमध्ये प्रामाणिक कार्यकर्ता उभा राहू शकणार नाही, ही सध्याची शोकांतिका आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

...तर निवडणुकीला अर्थ राहणार नाही !

मतमोजणी उशिरा घेण्यात येत असून इतिहासात पहिल्यांदाच स्ट्रॉंगरूमच्या बाहेर सुरक्षेसाठी लोकांना रात्र काढावी लागत आहे. आता तब्बल वीस दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या काळात काहीही घडू शकते, अशा चर्चा सुरू आहेत. तसे काही घडले तर त्या निवडणुकीलाच अर्थ उरणार नाही, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in