
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगासह सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत विजयाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी रणनीती आखली आहे. त्यातच १६ जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छुप्या पद्धतीने प्रचाराचा सोयीस्कर मार्ग लोकप्रतिनिधींनी निवडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, तालुका, जिल्हा पालघर या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुंगण दिगर तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनपा शाळा क्रमांक २३, किसन नगर, ठाणे तसेच शिवडी, वडाळा इस्टेट मनपा शाळा, आंध्रा हायस्कूलजवळ, वडाळा या शाळेत उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे भेट देतील.
शैक्षणिक गुणवत्ता, सोयीसुविधांचा आढावा
शाळांचा दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, राज्यमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना नजीकच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत शालेय गणवेश व इतर सोयीसुविधांचा आढावा घेण्यात येणार आहे.