

पुणे : राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आता प्रत्येक शाळेत ‘पिंक रूम’ ही नवी संकल्पना राबवण्यात येणार आहे. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियाना’च्या उद्घाटन प्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी हे महत्त्वपूर्ण सूतोवाच केले. स्वसंरक्षण हे केवळ शारीरिक प्रशिक्षण नसून ती विद्यार्थिनींच्या आयुष्यातील एक महत्त्वाची शिस्त आहे, असे सांगत प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम झाले पाहिजे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर, शिक्षण संचालक महेश पालकर, शरद गोसावी, कृष्णकुमार पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज आणि त्यांच्या चमूने पुण्यातील ४७६ शाळांमधील सुमारे १२ हजार विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रत्यक्ष धडे दिले.
यावेळी मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की, जेव्हा एखादी मुलगी स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम होते, तेव्हा तिचे मनोबल उंचावते आणि तिच्या संपूर्ण जीवनात एक शिस्त निर्माण होते. हीच शिस्त देशाला बलशाली बनवण्यासाठी महत्त्वाची ठरणार असून या अभियानामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थिनी खऱ्या अर्थाने ‘निर्भय’ आणि ‘आत्मनिर्भर’ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळात शालेय स्तरावर दिल्या जाणाऱ्या सैनिकी प्रशिक्षणातून ‘राष्ट्र प्रथम आणि देश सर्वोच्च’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली जाणार आहे.
२६ जानेवारी २०२६ रोजी देशभरातील २ कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकत्रित कवायत करून जो विश्वविक्रम प्रस्थापित केला, तो देशासाठी अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौर नागपुरे यांनी सांगितले की, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणासारखे उपक्रम केवळ एक दिवसाचे प्रशिक्षण नसून ते आयुष्यभराचे शिक्षण आहे आणि आपल्यातील सुप्त शक्ती जागृत करण्याची हीच खरी वेळ आहे.
केवळ पुस्तकी ज्ञानावर नको
केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कला, क्रीडा आणि स्वसंरक्षणाला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे मंत्री भुसे यांनी नमूद केले.