काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन

खान्देशात काँग्रेस विचार तळागाळात पोहचविण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी समाजकारण आणि राजकारणात पाऊल ठेवले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन
Published on

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

रोहिदास पाटील यांनी राजकीय कारकीर्दीत आमदार, खासदार तसेच खात्याचे मंत्री अशा पदांवर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. खान्देशात काँग्रेस विचार तळागाळात पोहचविण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी समाजकारण आणि राजकारणात पाऊल ठेवले. कृषी, फलोत्पादन, रोजगार, ग्रामविकास, पाटबंधारे, गृहनिर्माण, संसदीय कार्यमंत्री अशा विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून लोकांचे प्रश्न सोडवले.

विकासासाठी झटणारे नेतृत्व गमावले – मुख्यमंत्री शिंदे

राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

विकासाला समर्पित नेतृत्व हरपले - अजित पवार

धुळे जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेले रोहिदास पाटील यांचे नेतृत्व होते. शैक्षणिक, सामाजिक, सहकारी संस्थांच्या उभारणीतून धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. अक्कलपाडा धरणाच्या निर्मितीतही त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्या निधनाने धुळे जिल्ह्यातील खान्देशच्या विकासाला वाहिलेले समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे. 

काँग्रेस पक्षाची भरून न निघणारी हानी - नाना पटोले

रोहिदास पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काँग्रेस पक्ष हा पाटील कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

अल्प परिचय

काँग्रेस सेवादलचे सदस्य, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशी पदेही त्यांनी भूषवली. १९७२ मद्ये ते धुळे जिल्हा परिषदेवर निवडून गेले. १९८० साली त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला. ते १९८६ मध्ये महसूल राज्यंमत्री झाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व उपाध्यक्ष पदावरही रोहिदास पाटील यांनी काम केले आहे. शैक्षणिक संस्था सुरू करून धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला- मुलींना शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली तसेच जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणी, जवाहर महिला सहकारी सूत गिरणी, जवाहर सहकारी कुक्कुटपालन संस्था, जवाहर सहकारी पशुखाद्य संस्थेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे विणले.

logo
marathi.freepressjournal.in