संसर्गजन्य रुग्णांमुळे महाराष्ट्र आजारी! शेजारील राज्याचा अभ्यास करण्याचे निर्देश, राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

राज्याची भौगोलिक विविधता, औद्योगीकरण, शहरीकरण, वातावरणीय बदलामुळे विविध साथरोग रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
संसर्गजन्य रुग्णांमुळे महाराष्ट्र आजारी! शेजारील राज्याचा अभ्यास करण्याचे निर्देश, राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Published on

मुंबई : राज्याची भौगोलिक विविधता, औद्योगीकरण, शहरीकरण, वातावरणीय बदलामुळे विविध साथरोग रुग्णांमध्ये वाढ होत आहे. संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्याचा साथरोग नियंत्रण व्यवस्थेचा अभ्यास करून राज्याच्या साथरोग नियंत्रण व्यवस्थेत बदल करा. शहरी भागासाठी बॉय लॉजची निर्मिती करा, असे निर्देश राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

महाराष्ट्राची भौगोलिक विविधता, औद्योगीकरण, शहरीकरण, वातावरणातील बदल या कारणांमुळे विविध साथरोगांच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोविड आजाराबरोबर इतर साथीचे आजार हिवताप, डेंगी, झिका, इन्फ्लुएंझा, कावीळ, कॉलरा, इन्फ्लुएंझा ए, कॉलरा, टायफॉइड, तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, स्क्रप टायफस, हिपॅटायटीस "ए", "ई", लेप्टोस्पायरोसिस जे ई, चंडिपुरा हे आजार, लस प्रतिबंधक रोग, गोवर, गालगुंड, घटसर्प, धनुर्वात, पोलिओ, रेबीस, पेर्दुसिस या सारखे जुने साथीचे आजार तर नव्याने उद्भवणारे इबोला, केएफडी, निपाह आणि झिका सारख्या आजारांचे रुग्ण वेळोवेळी डोके वर काढत असतात. त्यामुळे या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.

राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी तसेच विविध विभागांच्या समन्वयासाठी पुनर्गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समितीची आढावा बैठक दूरभाष्य प्रणालीद्वारे पार पडली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार या उच्चस्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. संसर्गजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व विभागांचा सहभाग व समन्वय आवश्यक आहे. त्यानुसार सर्व विभागांना त्यांची कामे आणि भूमिका या बैठकीत विशद करण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अमगोथू श्रीरंगा नाईक, आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी ही बैठक पार पडली. नगरविकास विभाग, ग्रामीण विकास विभाग, गृह निर्माण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, शिक्षण विभाग-माध्यमिक/उच्च माध्यमिक, महिला व बालविकास विभाग, पशुवैद्यकीय विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, राष्ट्रीय विषाणू परिषद, पुणे आदी संबंधित ३२ विभागांचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपापली भूमिका समन्वयाने पार पाडावी यासाठी प्रत्येक विभागाने करावयाची कार्यवाही याविषयी विभागवार माहिती देण्यात आली. सहसंचालक राधा किशन पवार यांनी राज्यातील सध्याच्या संसर्गजन्य आजारांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन समितीची कार्यपद्धती व उद्दिष्ट्ये याबाबत मार्गदर्शन केले.

‘बाय लॉजची निर्मिती करा’

आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक यांनी शहरी विभागाकरिता ‘बाय लॉज’ निर्माण करणे गरजेचे असल्याचे यावेळी सूचित केले. अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सध्याच्या सणासुदीच्या व येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर सर्वांनी दक्ष राहावे, तसेच आजारांबाबत जनतेमध्ये भिती निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in