महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला चपराक; महायुतीला १७, तर महाविकास आघाडीला ३० जागा

महाराष्ट्रात एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची दोन शकले केल्यानंतर तसेच पवार कुटुंबीयांत फूट पाडूनही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला फारसे यश पदरात पडले नाही.
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला चपराक; महायुतीला १७, तर महाविकास आघाडीला ३० जागा

मुंबई : महाराष्ट्रात एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची दोन शकले केल्यानंतर तसेच पवार कुटुंबीयांत फूट पाडूनही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला फारसे यश पदरात पडले नाही. गेल्या दोन वर्षांत भाजपने महाराष्ट्रात जे कूटनीतीचे राजकारण केले ते त्यांच्यावरच बूमरँग बनून उलटल्याचे लोकसभा निकालावरून दिसून आले आहे. नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपने राज्यात जे घाणेरडे राजकारण केले त्याला मतदारांनी मतपेटीद्वारे पूर्णत: झिडकारले आहे. ही एकप्रकारे भाजप, मोदी व फडणवीसांना मोठी चपराक आहे. राज्यात महायुतीला १७ जागा, तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या असून सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडून आले आहेत.

राज्यात महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला केवळ ९, शिवसेना शिंदे गटाला ७ व राष्ट्रवादी अजित पवार गटाला १ जागा मिळाली, तर महाविकास आघाडीने ३० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गट ९, राष्ट्रवादी शरद पवार गटाला ८ व कॉंग्रेसला १३ जागा मिळाल्या आहेत. एक जागा सांगलीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील (मूळचे कॉंग्रेस नेते) यांनी जिंकली.

महायुतीची राज्यात पिछेहाट होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र ७ जागा जिंकत अनपेक्षित यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसला असून सुनिल तटकरे यांच्या रूपाने केवळ एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती मतदारसंघात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला आहे.

राज्यातील पक्षनिहाय स्थिती

भाजप- ९

शिवसेना (एकनाथ शिंदे)- ७

राष्ट्रवादी (अजित पवार)- १

काँग्रेस- १३

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ९

राष्ट्रवादी (शरद पवार)- ८

अपक्ष- १

logo
marathi.freepressjournal.in