ऑल द बेस्ट...दहावीचा आज निकाल; कुठे आणि कसा बघायचा रिझल्ट?

इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल मंगळवारी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी १ वाजता पाहता येणार आहे.

येत्या १५ मेपूर्वी निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राज्य मंडळातर्फे कळविण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परीक्षेला राज्यातील १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यात ८.६ लाख मुले, ७.४७ लाख मुली आणि १९ तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश होता. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार mahresult.nic.in वर त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स, रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून ऑनलाइन निकाल तपासू शकतात.

विद्यार्थ्यांसाठी खालील संकेत स्थळांवर निकाल उपलब्ध असतील: https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in, http://sscresult.mkcl.org, https://results.targetpublications.org

विद्यार्थी त्यांच्या विषयानुसार मिळालेले गुण यावर पाहू शकतात. तसेच, निकालाची प्रिंट आऊट काढू शकतात. शाळांना त्यांचा एकत्रित निकाल "in school login" या वेबसाईटवर दिसेल.

विद्यार्थ्यांसाठी मंडळाने केलेल्या सूचना

-ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकांची झेरॉक्स कॉपी हवी आहे, ते त्यासाठी अर्ज करू शकतात. तसेच, ज्यांना पेपर पुन्हा तपासायचा आहे, म्हणजेच पुनर्मूल्यांकन करायचे आहे, ते अर्ज करू शकतात. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मे आहे. अर्ज भरताना Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking चा वापर करून शुल्क भरता येईल.

-उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा.

-ज्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यायची आहे. त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ मे पासून सुरु होईल. "जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक १५ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in