संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हुश्श..एसटीचा संप मिटला! मूळ पगारात साडेसहा हजारांची वाढ, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यशस्वी तोडगा

गावाकडे जाण्यासाठी लगबग सुरू असलेल्या चाकरमान्यांच्या पदरी बुधवारीही निराशा आली. एसटी कामगारांच्या संपाचा जोरदार फटका गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला. मात्र बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला.
Published on

मुंबई : गावाकडे जाण्यासाठी लगबग सुरू असलेल्या चाकरमान्यांच्या पदरी बुधवारीही निराशा आली. एसटी कामगारांच्या संपाचा जोरदार फटका गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला. मात्र बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या १३ संघटनांसोबत झालेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे गणपतीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांपुढील विघ्न टळले आहे.

एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगार संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामुळे बुधवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी दिवसभरात राज्यभरातील एसटीचे २५१ पैकी ९४ आगार पूर्णत: बंद होते. तर एसटीच्या ४००६९ नियोजित फेऱ्यांपैकी आंदोलनामुळे २७४७० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. दिवसभर सुमारे ७० टक्के वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे बुधवारी २२ कोटींचे तर मंगळवारी १५ कोटींचे नुकसान झाले आहे.

बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात १३ कामगार संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन वाढीची मागणी मान्य करत इतर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांना विशेषत: महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी डेपोत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी १९३ कोटी रुपये एमआयडीसीच्या निधीतून मंजूर करण्याचे आदेश दिल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२० पासून मूळ वेतनात सरसकट ६,५०० रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हा संप मागे घेण्यात यश आल्याने दोघांचेही सामंत यांनी आभार मानले.

एसटी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेल्या संपामुळे मंगळवार आणि बुधवारी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. आता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेले धरणे आंदोलन तीव्र झाले आहे. औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांचा हा अघोषित संप बेकायदेशीर ठरवला आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्यातील एसटीच्या २५१ पैकी ९४ आगारांमधील कारभार बुधवारी पूर्णत: ठप्प होते. तर ९२ आगारांमध्ये अंशत: कामकाज सुरू होते. ६५ आगारांतील वाहतूक सुरळीत सुरू होती. बुधवारी ४० हजारांहून नियोजित फेऱ्यांपैकी आंदोलनामुळे २७,४७० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे दिवसभर सुमारे ७० टक्के वाहतूक बंद होती. तर, बुधवारी एसटीचा सुमारे २२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला.

मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतून कोकणात ५ हजार बस सोडण्यात येणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी १ हजार जादा बस सोडण्यात येणार होत्या. त्यापैकी मुंबई विभागातून ३०६ बस, पालघर विभागातून १५० बस व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. तर, उर्वरित बस रात्री उशिरापर्यंत मार्गस्थ होणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) कडून सांगण्यात आले.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत राज्यभरातील एसटीचे २५१ पैकी ६३ आगार पूर्णत: बंद होते. ७३ आगारांमध्ये अंशत: वाहतूक सुरू होती. तर ११५ आगारांमध्ये पूर्णत: वाहतूक सुरळीत सुरू होती. सर्वाधिक गैरसोय बुधवारी जाणाऱ्या गणेशभक्तांची झाली. सुमारे १ हजार बसेस मुंबई, ठाणे व पालघर विभागातून रवाना होणार होत्या. मात्र बसेस उपलब्ध न झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले.

बुधवारी सकाळी ६३ बसआगार पूर्णपणे बंद होते, मात्र दुपारपर्यंत ही धग वाढून ९६ आगार बंद करण्यात आले होते. अंशत: बंद असलेल्या आगारांची संख्याही ७३ वरून ८२ इतकी झाली. मराठवाडा आणि उत्तर मराठवाडा विभागात दुसऱ्या दिवशी या संपाची झळ आणखीन जाणवली. तिथे २६ आणि ३२ बसआगार पूर्णत: बंद होते. मुंबई-पुणे मार्गावरील ई- शिवनेरी बस सेवा सुरळीत सुरू आहे, असे एमएसआरटीसीच्या प्रवक्त्याने सांगितले.

कामावर रुजू व्हावे

एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारल्याने प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. तर एसटी महामंडळाला आर्थिक फटकाही बसला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला असून कर्मचाऱ्यांना वेतन वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in