एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या २२०० गाड्या रखडल्या; मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीअभावी फाइल लालफितीत अडकली

फाइल वेळेवर पाठवूनसुद्धा सही न होण्यामागील कारण काय? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी उपस्थित केला आहे.
एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या २२०० गाड्या रखडल्या; मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीअभावी फाइल लालफितीत अडकली

मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या २,२०० गाड्या येण्याची प्रक्रिया तूर्तास तरी रखडली आहे. निधी उपलब्ध करून देण्याच्या फाइलवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी न झाल्याने एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या गाड्या लालफितीत अडकल्या आहेत.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात २,२०० गाड्या दाखल होणार आहेत. परंतु निधी उपलब्ध न झाल्याने गाड्या घेण्याची प्रक्रिया रखडली आहे. सद्यस्थितीत एसटीच्या ताफ्यात १४ हजार बसगाड्या आहेत. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी २,२०० गाड्या एसटीच्या ताफ्यात सामील होणार आहेत. परंतु निधी उपलब्ध करून देण्याच्या फाइलवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी न झाल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे याचा फटका एसटी कर्मचारी व प्रवासी यांना बसत आहे. फाइल वेळेवर पाठवूनसुद्धा सही न होण्यामागील कारण काय? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी उपस्थित केला आहे.

एसटीच्या जवळपास १० हजार बसेस मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे दुरुस्तीचे काम करून यांत्रिकी कर्मचारी हैराण झाले आहेत. याशिवाय या गाड्या रस्त्यावर चालवताना चालकांना त्रास होत आहे. एसटी महामंडळाने अशोक लेलँड कंपनीकडून बॉडी बांधणीसह तयार २२०० बसेसची निविदा मंजूर केलेली आहे. पण त्यासाठी लागणारा निधी मात्र सरकारकडून आलेला नाही. त्यामुळे सरकारच्या लालफितीत २,२०० गाड्या अडकल्या, असा आरोप त्यांनी केला.

वर्क ऑर्डर दिल्याशिवाय गाड्या ताब्यात येऊ शकणार नाहीत आणि निधी प्राप्त झाल्याशिवाय महामंडळ वर्कऑर्डर देऊ शकत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in