कौशल्य विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२४ मंगळवारी विधान परिषदेत सविस्तर चर्चा विनिमयानंतर पारित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याची मागणी सदर विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आली होती.
रतन टाटा
रतन टाटा संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई / नागपूर : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२४ मंगळवारी विधान परिषदेत सविस्तर चर्चा विनिमयानंतर पारित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याची मागणी सदर विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आली होती. माजी मंत्री आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सदर विधेयक मंगळवारी विधान परिषदेत मांडले आणि संबंधित चर्चेला सुरुवात झाली. 

विविध विधान परिषद सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास स्व. रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आला होता. सदर निर्णयाचे स्वागत करून याबाबतचे विधेयक एकमताने पारित करण्यात आले.

रतन टाटा यांनी विविध क्षेत्रांतील आणि उद्योगांच्या विकासासाठी केलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी नवोदित उद्योगांना प्रोत्साहन देत वेळोवेळी सहकार्य केले आहे. उद्योग क्षेत्रातील या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याला आदरांजली म्हणून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण बदलून "रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ" असे करण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे तसेच नवोदितांच्या संकल्पनांना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा उद्देश रतन टाटा यांच्या विचारांचे प्रतिक आहे आणि त्याचे आचरण करणे म्हणजे त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल. या नामकरणामुळे विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या तांत्रिक प्रगतीला गती मिळेल आणि युवकांना रतन टाटा यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात शिक्षण घेण्याचा अभिमान वाटेल.

logo
marathi.freepressjournal.in