

मुंबई : शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येते. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५१ विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या ‘नासा’ केंद्राला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ३ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर केला आहे.
शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शने घेण्यात येणार. या प्रदर्शनांत राज्यातील लाखभर शाळांमधील विद्यार्थी विविध प्रकल्प सादर करतात. या प्रकल्पांची तालुका, जिल्हा स्तरावर निवड होऊन मग हे प्रकल्प राज्य स्तरावरील प्रदर्शनांमध्ये समाविष्ट होतात. तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या प्रकल्पांसाठी आता ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विज्ञान संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा आणि संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ हा उपक्रम राज्य सरकारकडून सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नासाची वारी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार यंदा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणारे ५१ विद्यार्थी, १ शिक्षक, १ शिक्षिका तसेच २ प्रशासकीय अधिकारी, समन्वयकांचा समावेश आहे. या सर्वांच्या परदेश दौर्यासाठी विमान प्रवास, व्हिसा, निवास व स्थानिक प्रवास खर्चासह प्रतिव्यक्ती ६ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून एकूण ३ कोटी ३० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील ५१ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
विद्यार्थ्यांना इस्रोलाही देता येणार भेट
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच जिल्हास्तरावर निवड झालेल्या १८० विद्यार्थी व ८ शिक्षकांना बंगळुरू येथे असलेले भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमांतर्गत भेट देता येणार आहे. तसेच तालुका स्तरावर निवड झालेल्या २१ विद्यार्थ्यांच्या गटांना जवळच्या विज्ञान केंद्रांना भेट देता येणार आहे.