मुंबई : ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याने यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सहकार विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात राज्यातील २०० हून अधिक साखर कारखाने सुरू होऊन १०० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
राज्य सहकारी साखर संघाकडे विविध साखर कारखान्यांनी १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु, देशभरात साखरेचे दर वाढल्याने सणासुदीच्या काळात ग्राहकांना त्याची झळ बसू नये, यासाठी यंदा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. शेजारील कर्नाटक राज्यात साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात उसाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी १५ ऑक्टोबर पासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना प्रतिवर्षी २०० कोटी याप्रमाणे पुढील सात वर्षासाठी १४०० कोटी रुपयांचे सुलभ कर्ज देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या कर्जातून कारखान्यांना व्याज सवलत दिली जाणार आहे.
राज्यातील २०२५-२६ चा गाळप हंगाम
उसाखालील क्षेत्र - १३.७२ लाख हेक्टर
गाळप घेतलेले कारखाने - २१०
एकूण ऊस गाळप - १ लाख ४५ हजार मेट्रिक टन
साखर उत्पादन - ९९.२० लाख मेट्रिक टन
एफआरपीनुसार अदा केलेली रक्कम - ४० हजार २४५ कोटी रुपये