पुणे : महाराष्ट्रात गुरुवारपासून (१५ ऑक्टोबर) अधिकृतपणे ऊस गाळप हंगामाला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत केवळ ३० साखर कारखान्यांना प्रत्यक्ष गाळप परवाने देण्यात आले आहेत.
राज्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण २१३ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज सादर केले असून, उर्वरित अर्जांची आणि कागदपत्रांची पडताळणी साखर आयुक्तालयाकडून सुरू आहे. दरम्यान, गाळप परवाना न घेता बेकायदेशीरपणे कारखाना सुरू करून गाळप करणाऱ्या कारखानदारांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिला आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामासाठी सप्टेंबर महिन्यात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत १०६ सहकारी आणि १०७ खासगी अशा एकूण २१३ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी दावे दाखल केले आहेत. सध्या या अर्जांसोबत सादर केलेल्या कागदपत्रांची तसेच विविध आवश्यक अटींच्या पूर्ततेची सखोल तपासणी केली जात आहे. यापैकी ४० सहकारी आणि ४५ खासगी कारखान्यांच्या अर्जांची प्रादेशिक स्तरावर छाननी सुरू आहे. याशिवाय, २३ सहकारी आणि १९ खासगी कारखान्यांच्या प्रस्तावांबाबत स्थगनादेश किंवा अर्ज रद्द करण्यासंदर्भातील नोंदी आहेत. त्यामुळे सर्व अटींची योग्य पूर्तता झाल्यानंतरच टप्प्याटप्प्याने परवाने वितरित केले जात आहेत.