मुंबई : 'नीट-यूजी' पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीमुळे रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे २८ जून रोजी राज्यभरात होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील सुमारे १ लाख ८ हजार उमेदवारांना याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या पत्रकानुसार, २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे सर्व उपाय करण्यात आले होते. मात्र, शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात काही प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. भिवंडी परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या प्रश्नसंचातील काही प्रश्न आणि २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेतील प्रश्न समान असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात होणे आवश्यक असल्याचे सांगत रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
पुन्हा परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्याचा कालावधी लागणार
पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आलेली ही परीक्षा पुन्हा घेण्याच्या प्रक्रियेसाठी तीन आठवडे लागतील, असे 'एमएससीई' च्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी सांगितले. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) लवकरच परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परिषदेने जाहीर केले आहे.
परीक्षेसाठी पुन्हा शुल्क नाही
या परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. त्यामुळे, परीक्षेसाठी राज्यातील परिक्षार्थीकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. ३७ शहरातील १०२८ परीक्षा केंद्रावर पुन्हा नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिली.
विरोधकांचा हल्लाबोल
या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये, पेपरफुटी हा आता अपवाद राहिलेला नाही, तर या सरकारची ओळख बनली आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच टीईटीचा पेपर फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि भविष्यावर पाणी फेरणाऱ्या या रॅकेटला नेमके राजकीय संरक्षण कोणाचे आहे, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला.
तीन आरोपींना अटक, दीड कोटी रुपयांचा सौदा
याप्रकरणी विमानतळ परिसरातून भिवंडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून यातील २ आरोपी बिहारमधील आहेत, तर एक आरोपी हरयाणामधील आहे. टीईटी पेपर विक्रीसाठी आरोपी दिल्लीतून आले होते. राजीव शाह (बिहार), आकाश कुमार (बिहार) आणि धीरज कुमार (हरयाणा) अशी आरोपींची नावे आहेत. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांच्या झडतीत ४ सेट पेपर मिळाले असून मोबाईल डेबिट कार्डही मिळाले आहे. आरोपींनी या पेपरसाठी १.५ कोटी रुपयांची आगाऊ (अॅडव्हान्स) मागणी केली होती. हे पेपर पुढे स्थानिक एजंट्स, कोचिंग क्लासेस किंवा उमेदवारांना मोठ्या रकमेत विकले जाणार होते.
टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर 'मकोका' खाली कारवाई?
शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना - अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार - आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यासाठी आपण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार - असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणाची सखोल, - निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा कोणत्याही संघटित टोळीचा भाग असो, त्याला कोणतीही सवलत दिली जाणार - नाही. संबंधितांवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई - करण्यात येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
'एसआयटी' चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या 'एसआयटी' चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन एसीपी, नऊ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश असलेली 'एसआयटी' स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणातही कोचिंग सेंटर आणि सर्वांची चौकशी होणार आहे. प्राथमिक तपासात यात शिक्षण विभागाचा सहभाग आढळला नाही, यातील एका आरोपीने केंद्रीय विद्यालयात नोकरी लावण्यासाठी पैसे दिले होते, तर एका आरोपीने 'टीईटी'ची परीक्षा दिली, मात्र तो त्यात नापास झाला होता.
हा तर तरुणांच्या भविष्यावर दरोडा - राहुल गांधी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) पेपरफुटीची आणि परीक्षा पुढे ढकलण्याची घटना म्हणजे तरुणांच्या भविष्यावरील 'दरोडा' आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. आणखी एक पेपरफुटी, आणखी एक परीक्षा रद्द. यावेळी महाराष्ट्राची 'टीईटी'. एकूणच देशाची शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था आता 'खंडणीखोरीची' व्यवस्था बनली आहे, ज्यामुळे देशातील प्रत्येक तरुण असुरक्षित झाला आहे,' असेही त्यांनी नमूद केले.