

मुंबई : बनावट इंजेक्शन्स आणि औषधांची विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांविरुद्ध राज्य सरकार अत्यंत कठोर पावले उचलत आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेसच्या नावाने बनावट ‘अल्ब्युरेल’ इंजेक्शन तयार करून महाराष्ट्रात विकणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी दोषींवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत केली.
आमदार श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, चित्रा वाघ आणि इतरांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना झिरवाळ यांनी ही माहिती दिली.
झिरवाळ म्हणाले की, “पुणे येथील मे. मैत्री फार्मास्युटिकल्स आणि मे. श्रीराम हेल्थकेअर येथे तपासणी केली असता, रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनीच्या नावाने बाजारात आलेला ‘अल्ब्युरेल २० टक्के’ इंजेक्शनचा साठा बनावट असल्याचे लॅब रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. पोलिसांनी येथून लाखो रुपयांचा बनावट साठा जप्त केला. नागपूरच्या मे. हितांशी फार्मास्युटिकल्सवर टाकलेल्या छाप्यातही हाच बनावट साठा आढळला. शासकीय विश्लेषक यांनी हे औषध पूर्णपणे बनावट असल्याचे घोषित केले आहे. विशेष म्हणजे, रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनीने आपण अशा कोणत्याही बॅचचे उत्पादन केले नसल्याचे लेखी स्पष्ट केले आहे.”
या औषधांच्या पुरवठा साखळीचे धागेदोरे इतर राज्यांशी जोडले गेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईतील ‘आरआरटी फार्मा’च्या चालकाने हे औषध दिल्लीतील दानिश खान याच्याकडून विना बिलाने खरेदी केले होते. तर दानिश खान याने हा माल चंदीगड (पंजाब) येथील राजकुमार मिश्रा याच्याकडून रोख स्वरूपात घेतला होता. तेथून मुंबई, पुणे, नागपूर आणि अगदी हैदराबादपर्यंत या बनावट औषधांचे वितरण करण्यात आले. या प्रकरणी पुणे आणि नागपूर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आला असून, आरोपींना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांनी मंत्र्यांना घेरले
मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी मंत्र्यांना चांगलेच घेरले. मंत्र्यांच्या उत्तरांनी समाधान न झाल्याने आमदार परिणय फुके, भाई जगताप, अनिल परब यांनी उत्तरावर नाराजी व्यक्त केली. हा प्रश्न राखून ठेवण्याची विनंती अनिल परब यांनी केली. त्यानुसार तालिका सभापती प्रमोद जठार यांनी हा प्रश्न राखून ठेवला आहे.