

मुंबई : राज्यात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली. यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातील विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबविले जात असल्याने त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
प्रस्तावित ‘महा सीएसआर प्राधिकरणा’मार्फत सीएसआर निधीचे समन्वयन, निरीक्षण आणि योग्य वापर सुनिश्चित करण्यावर भर देण्यात यावा. शासनाच्या प्राधान्यक्रमातील प्रकल्पांची दर्जेदार प्रकल्प बँक तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून द्यावी. सीएसआरसाठी पात्र ठरलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना योग्य प्रकल्प आणि स्वयंसेवी संस्था निवडण्यासाठी मार्गदर्शन करावे. तसेच राज्यातील उत्कृष्ट सीएसआर उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. सीएसआरमधून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या देखभाल आणि दुरुस्तीवर विशेष भर देण्यात यावा.
मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष
प्रस्तावित सीएसआर प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतील तर गव्हर्निंग कौन्सिलमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असेल. मुख्य कार्यकारी अधिकारी हे या गव्हर्निंग कौन्सिलचा सदस्य-सचिव तसेच कार्यकारी कौन्सिलचा प्रमुख असेल.