

मुंबई : दुधामध्ये भेसळ करून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच 'मोक्का' अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. अन्नपदार्थांमधील भेसळीची प्रकरणे सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतली असून दोषींवर कठोर कायदेशीर तरतुदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान डॉ. मनीषा कायंदे आणि कृपाल तुमाने यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना झिरवाळ यांनी ही माहिती दिली.
नुकत्याच अंधेरी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईचा दाखला देत त्यांनी सांगितले की, एफडीए आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी सात ठिकाणी छापे टाकून दूध भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.
सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यास मदत होणार असून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तपास यंत्रणांना अधिक अधिकार देणार
राज्यातील जनतेला शुद्ध आणि दर्जेदार दूध मिळावे यासाठी सरकार कटिबद्ध असून, यापुढे अशा गुन्ह्यांमध्ये सापडणाऱ्यांवर थेट संघटित गुन्हेगारीच्या कलमांनुसार गुन्हे दाखल केले जातील. यामुळे भेसळ करणाऱ्यांवर वचक बसेल आणि तपास यंत्रणांना अधिक अधिकार मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रॅकेटमध्ये सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
चर्चेत सहभागी होताना सर्वपक्षीय सदस्यांनी एफडीए अधिकारी आणि भेसळ करणाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप केला. प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे अवैध धंदे सुरू असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना मंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केले की, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल.