मुंबई : कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ५ ते १९ सप्टेंबर दरम्यान मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या टोल नाक्यावर कोकणात जाणाऱ्या भाविकांना संपूर्ण टोल माफी जाहीर केल्याचा आदेश राज्य सरकारने बुधवारी जारी केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळणार आहे.
दरवर्षी हजारो कोकणवासीय गणेशोत्सवात मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोकणात जाणाऱ्या भाविकांना संपूर्ण टोल माफी देण्याच्या निर्णयाचा अध्यादेश राज्य सरकारने जारी करण्यात आला आहे.
५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राम-६६) वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
परतीच्या प्रवासातही टोल माफी
"गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन" अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस देण्यात येतील. पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येतील.
... तर कारवाई निश्चित - उदय सामंत
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने टोल माफी केली. मात्र खाजगी वाहनधारकांनी भाविकांकडून जादा पैशांची मागणी अथवा लूट केल्याची तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.