जल संवर्धनात महाराष्ट्र देशात पहिला

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतीय जलसंस्थांची गणना करून एक अहवाल प्रकाशित करण्यात आला
जल संवर्धनात महाराष्ट्र देशात पहिला

जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतीय जलसंस्थांची गणना करून एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालात जलसंधारण योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबवणाऱ्या राज्यांचा समावेश आहे. त्यानुसार जलसंधारणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

भारतातील जलाशयांच्या पहिल्या गणनेच्या अहवालात देशभरातील तलाव आणि इतर जलसाठ्यांच्या संदर्भातील समावेशक माहिती संकलित करण्यात आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने वर्ष २०१८-१९ मध्ये केलेल्या या गणनेमध्ये देशातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या क्षेत्रातील २.४ दशलक्षाहून अधिक जलाशयांची मोजणी करण्यात आली. जलसंवर्धन योजना राबवण्यात व यशस्वी करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. या अहवालानुसार पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक जलसाठे आहेत. पाण्याच्या टाक्यांच्या संख्येचा विचार करता आंध्र प्रदेश आघाडीवर आहे. देशातील सर्वाधिक तलाव तामिळनाडू राज्यात आहेत, असे दिसून येते.

देशभरात मोजण्यात आलेल्या २४,२४,५४० जलाशयांपैकी ९७.१ टक्के जलाशय ग्रामीण भागात आहेत आणि केवळ २.९ टक्के जलाशय शहरी भागात आहेत. देशातील एकूण जलाशयांपैकी ५९.५ टक्के जलाशय तळी स्वरूपातील आहेत, तर त्याखालोखाल टाक्या १५.७ टक्के तर इतर जलसाठे १२.१ टक्के आहेत. त्यात पाझर तलाव, बंधारे, तलाव इतर प्रकारच्या पाणी साठवण पद्धतींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील जलसाठा

महाराष्ट्रात एकूण ९७,०६२ जलाशय असून, त्यापैकी ५७४ नैसर्गिक तर ९६,४८८ मानवनिर्मित आहेत. या ५७४ नैसर्गिक जलाशयांपैकी ९८.४ टक्के म्हणजेच ५६५ जलाशय ग्रामीण भागात, तर उर्वरित १.६ टक्के म्हणजेच ९ जलाशय शहरी भागात आहेत. तसेच मानवनिर्मित ९६,४८८ जलाशयांपैकी ९९.३ टक्के म्हणजेच ९५,७७८ जलाशय ग्रामीण भागात, तर उर्वरित ०.७ टक्के म्हणजेच ७१० जलाशय शहरी भागात आहेत.

जलयुक्त शिवारचे यश - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होत असून जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण! जलशक्ती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या जलसंधारणाच्या पहिल्या जनगणनेच्या अहवालानुसार जलसंधारण योजना मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे राबवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in