कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते. हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते, आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे कोण जागत आहे) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. याचाच अर्थ असा आहे की कोण जागे आहे याचा मथितार्थ आहे ‘कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे’ असे देवी विचारते, अशी आख्यायिका आहे.
“पुनर्विचारात्मक पर्यटन” या संकल्पनेस अनुसरून भारतीय पारंपारिक सण आणि उत्सव साजरे करुन पर्यटकांना देशाटनाबरोबरच सांस्कृतिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा, या हेतुने व्यवस्थापकिय संचालक श्रध्दा जोशी यांच्या संकल्पनेतुन आणि मा. महाव्यवस्थापक चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, असे मानले जाते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.
आरोग्यशास्त्रदृष्ट्या महत्त्वाची असलेली कोजागिरी पौर्णिमा दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते.
संस्कृती जपताना निसर्गाचीही जोपासना करणे आणि पर्यटनाचा निखळ आनंद पर्यटकांना देणे याच सदहेतुने कोजागिरी पौर्णिमा महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये साजरी करण्यात येणार असुन यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच केसरी दुधाचा आस्वाद आणि चंद्रप्रकाशामध्ये मेडीटेशनसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सदरचे उपक्रमाअंतर्गत कोजागिरी पौर्णिमा महामंडळाच्या पर्यटक निवास औरंगाबाद, फर्दापुर, लोणार आणि कलाग्राम येथे साजरी करण्यात येणार असुन पर्यटकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.