
मुंबई : पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासह पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ (पर्यटन मित्र) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सीसीटीव्ही तत्काळ प्रतिसाद यंत्रणा पर्यटनस्थळी उपलब्ध असणार आहे.
पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच पर्यटन क्षेत्रात १ लाख कोटींची गुंतवणूक व १८ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
राज्यातील पर्यटन स्थळे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व ‘मेस्को’ने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
पर्यटन सुरक्षा दलाच्या नव्याने सुरुवातीमुळे राज्यातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळेल. हे दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल. पर्यटन स्थळांवर सीसीटीव्ही, हेल्पलाईन आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
प्रायोगिक तत्त्वावर ‘पर्यटन सुरक्षा दल’
२ ते ४ मे २०२५ दरम्यान पार पडणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित होणार आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २५ जवानांची नियुक्ती करण्यात येईल. या जवानांना पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनानुसार आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. हे दल २५ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यरत राहील.