महाराष्ट्र टुरिझमची मुंबईतील लोकल हिंदीची ओळख करुन देणारी पोस्ट व्हायरल, अनेकांनी दिल्या तीव्र प्रतिक्रिया

लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया बघता महाराष्ट्र टुरिझम ऑफिशिअलने ही पोस्ट काढून टाकल्याचं समजत आहे.
महाराष्ट्र टुरिझमची मुंबईतील लोकल हिंदीची ओळख करुन देणारी पोस्ट व्हायरल, अनेकांनी दिल्या तीव्र प्रतिक्रिया
Published on

आपल्याकडे भाषा हा अन्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. यावरुन भाषावार प्रांत रचना देखील केली गेली आहे. ज्या त्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेशानुसार राज्यांची रचना झाली आहे. अनेकदा भाषेवरुन वाद देखील होतात. १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी दिवस' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अनेकदा हिंदी आमच्यावर लादली जाते, असा नाराजीचा सूर देखील अनेक ठिकाणांवरुन निघताना दिसतो. दक्षिणेतील राज्य याबाबत आघाडीवर आहेत. आता 'महाराष्ट्र टुरिझम ऑफिशिअल' वरुन हिंदी दिनानिमित्ताने मुंबईत बोलल्या जाणाऱ्या लोकल हिंदी भाषेबाबतची एक पोस्ट सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

महाराष्ट्र टुरिझम ऑफिशीअलवरुन अत्यंत क्रिएटीव्ह पद्धतीने मुंबईत बोलल्या जाणाऱ्या लोकल हिंदी भाषेवर मजेशीरपणे कटाक्ष टाकण्यात आला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी ही भाषा मुंबईची नाही. मुंबईसह महाराष्ट्राची मराठी भाषा असल्याचं म्हटलं आहे. काहींनी अगदी टोकाची भाषा वापरुन या पोस्टवर टीका केली आहे.

काय आहे नेमकी पोस्ट ?

महाराष्ट्र टुरिझमने मुंबईकर नसलेल्या लोकांना मुंबईतील प्रसिद्ध असलेली लोकल हिंदी भाषेची मजेशीरपणे ओळख करुन दिली आहे. हे करताना त्यांनी काही मजेशीर उदाहणं दिले आहेत. जेव्हा तुम्ही मुंबईत असाल तेव्हा या शब्दांचा अर्थ जशाचा तसा घ्यायचा नाही, असं सुरुवातीलाच या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 'बोले तो' असं जर कुणी तुम्हाला मुंबईत म्हणालं तर त्याचा अर्थ हा भाषांतरानुसार 'त्याला काय म्हणायचं आहे?' असा न घेता तो 'याचा अर्थ काय आहे' असा घ्यायचा असतो.

पुढे या पोस्टमध्ये 'चिपका डाल' हा शब्द दिला असून त्याचा शब्दश: अर्थ हा 'चिटकवून टाक' असा होतो, पण मुंबईच्या लोकल हिंदीत तो तसा न घेता 'कानशिलात मार' असा होतो. पुढचा शब्द हा 'पका मत' असा आहे. याचा अर्थ 'स्वयंपाक करु नको' असा न होता तो 'निघ येथून, त्रास देऊ नकोस' या अर्थाने घेतला जातो.

या नंतर महाराष्ट्र टुरिझमच्या या पोस्टमध्ये 'खजूर' हा शब्द दिला आहे. आता हे ऐकून एखाद्याला खायचं खजूर वाटेल पण तसं नाही. तर या शब्दाचा अर्थ मुंबईच्या लोकल हिंदी भाषेत 'मुर्ख' या अर्थाने घेतला जातो. यानंतर मुंबईत तुम्हाला जर कुणी 'रावस' असं म्हणलं तर त्याचा अर्थ हा कुठला मासा आहे असं समजू नका, याचा अर्थ 'मस्त, छान' या अर्थाने घेतला जातो. जर तुम्हाला कुणी मुंबईत 'हिला डाल' असं म्हटलं तर लगेच एखादी वस्तू जागची हलवायला जाऊ नका, याचा अर्थ 'चकित कर', 'आश्चर्याचा धक्का दे' असा होता, असं या पोस्टच्या माध्यमातून सुचवून मुंबईय्या ट्विस्टमध्ये हिंदी दिवस साजरा केला गेला आहे.

महाराष्ट्र टुरिझमची पोस्ट होते ट्रोल

हिंदी दिवसाचं अवचित्य साधून महाराष्ट्र टुरिझम ऑफिशिअलकडून अत्यंत मजेशीर पद्धतीने ही पोस्ट करण्यात आली आहे. यावर अनेकांनी त्यांच्या या क्रिएटिव्हीटीचं कौतूक केलं आहे. असं असलं तरी यापेक्षा जास्त ही पोस्ट ट्रोल होताना दिसत आहे. अनेकांना महाराष्ट्र टुरिझमचे या पोस्टवरुन वाभाडे देखील काढले आहेत. तर काहींनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

काहींनी ही हिंदी भाषा नसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी तुमच्या कार्यालयाला भेट द्यावी लागेल असा धमकी वजा इशाराच दिला आहे. काही लोकांनी ही मुंबईची भाषा नसल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकांनी या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा हिंदी नसून मराठी असल्याचं म्हणत महाराष्ट्र टुरिझमची कानउघडणी केली आहे. लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया बघता महाराष्ट्र टुरिझम ऑफिशिअलने ही पोस्ट काढून टाकल्याचं समजत आहे.

logo
marathi.freepressjournal.in