

एकीकडे राज्यभरात ३०० कोटी नवीन वृक्ष लावण्याचा जंगी कार्यक्रम आखला जात असतानाच दुसरीकडे झाडे तोडणे आणखी सोपे केले जात आहे. राज्य सरकारने वृक्षतोडीची परवानगी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्या कमी करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वन विभागाने बुधवारी जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार, वृक्षतोडीच्या परवानगीसाठी अर्जासोबत पूर्वी लागणाऱ्या ११ कागदपत्रांऐवजी आता केवळ पाच कागदपत्रे अनिवार्य असतील. राज्य सरकारने २०१७ मध्ये सुरू केलेल्या 'ईझ ऑफ डुइंग बिझनेस' उपक्रमाचा हा एक भाग असून, जुन्या परिपत्रकातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
या सुधारित परिपत्रकातील दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे परवानगीसाठी लागणारा वेळ. वृक्षतोडीचे प्रस्ताव आता जलद गतीने निकाली काढले जातील. विशेष तरतुदीनुसार, ही परवानगी आता ३० दिवसांऐवजी १५ दिवसांच्या आत दिली जाईल. मात्र, ही मंजुरी सविस्तर छाननी आणि पडताळणीनंतरच दिली जाणार आहे.
आजवर लागत होती ही कागदपत्रे
तलाठ्याकडील गाव नमुना नं. ८-अ.
तहसीलदारांकडून अधिकार अभिलेख आणि फेरफार नोंदवही.
संबंधित सर्व्हे नंबरचा नकाशा (आकारफोड/पुनर्मोजणी/एकत्रीकरण नकाशा); लगतची जमीन सरकारी असल्यास तहसीलदारांचे प्रमाणपत्र.
तलाठ्याकडून लगतच्या जमीनमालकांची नावे आणि सर्व्हे नंबर दर्शविणारा सीमा दाखला.
जमीन आणि झाडांच्या मालकीचे प्रमाणपत्र (वर्ग-१ जमिनीसाठी तहसीलदार/नायब तहसीलदार आणि वर्ग-२ जमिनीसाठी उपविभागीय अधिकारी/तहसीलदार यांच्याकडून).
सर्व्हे नं. १० नुसार झाडांचा तपशील; जलकुंभाच्या (नदीकाठ, ओढा, झरा किंवा तलाव) ३० मीटरच्या आत झाडे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी.
अकृषक जमिनीवर झाडांची घनता प्रति एकर २० पेक्षा कमी असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी.
तहसीलदारांनी दिलेला जातीचा दाखला (अनुसूचित जमातीच्या अर्जदारांसाठी).
वृक्ष अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार वृक्षलागवड करण्याचे हमीपत्र.
आता एवढ्यातच काम भागणार
अद्ययावत ७/१२ उतारा : जमिनीची मालकी प्रमाणित करण्यासाठी (त्यावर झाडांची नोंद असणे आवश्यक).
सह-धारकांची संमती : एकापेक्षा जास्त मालक असल्यास सर्वांची संमती आणि सेतू केंद्रातून प्राप्त केलेले फोटो.
नकाशा : संबंधित जमिनीचा ले-आउट नकाशा आणि सर्वेक्षण (सर्व्हे) क्रमांक.
जातीचा दाखला : अर्जदार अनुसूचित जमातीचा (ST) असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला दाखला.
हमीपत्र : तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावण्याचे लेखी आश्वासन.