राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

संविधानामध्ये समान नागरी कायद्याचा स्पष्ट उल्लेख आहे. राज्यांनी नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे संविधानाचे मार्गदर्शक तत्त्व आहे. त्यामुळे या विषयावर सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक आहे.
राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार
राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार
Published on: 

मुंबई : संविधानामध्ये समान नागरी कायद्याचा स्पष्ट उल्लेख आहे. राज्यांनी नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे संविधानाचे मार्गदर्शक तत्त्व आहे. त्यामुळे या विषयावर सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक आहे. समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक सहमती आणि योग्य प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा पुनरुच्चार केला.

दिवाळीनिमित्त वर्षा निवासस्थानी पत्रकारांसाठी आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमात फडणवीस यांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, आपण कोणत्याही व्यक्तीच्या नाही तर केवळ संस्थेच्या मागे उभे राहिलो. पण केवळ साडेपाच हजार सभासद असलेल्या एखाद्या ग्रामपंचायतीपेक्षा छोट्या असलेल्या गोकुळ संस्थेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजकारण आणले. त्यांच्यामुळेच या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले. काँग्रेसला देशात अतिडाव्या विचारसरणीचे सरकार आणायचे आहे; मात्र देशातील जनता ते स्वीकारणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.

तांत्रिक कोंडी फोडण्यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती

गोकुळवर संस्थेवर ताबा मिळवायचा असता तर सरकारने कधीच मिळविला असता. मात्र तसे काहीही न करता दोन्ही पक्षांकडे बहुमत नसल्याने तांत्रिक कोंडी फोडण्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्यानंतरही गोकुळबाबत सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि विनय कोरे या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतल्यास आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार नाही. त्या चार संचालकांना पाठविणार नाही, अशी भूमिका आपण जाहीर केली होती.

दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण आमच्याशिवाय होणार नाही

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून चर्चा सुरू असली तरी त्यांचे विलिनीकरण आमच्याशिवाय होणार नाही. तसेच दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत काय सुरू आहे हे फक्त दोन्ही पक्षांचे अध्यक्ष सांगू शकतात, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काय सुरू आहे, हे एकतर शरद पवार सांगू शकतील किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सांगू शकतील. बाकी नेते सांगतात त्याला काहाही अर्थ नसल्याचे फडणवीस म्हणाले

दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील तपासाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास करून अहवाल सादर केला आहे. या तपासात संशयास्पद बाब आढळली नसल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. या प्रकरणात उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच तपास यंत्रणांना पुढील कार्यवाही करावी लागते. मुंबई पोलिसांनी तपास करुन अहवाल न्यायालयास सादर केला होता. मात्र न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिले असून सध्या सीबीआयकडून तपास सुरू आहे.

बिष्णोईच्या आणखी एकाला लवकरच अटक होईल

परदेशातून लॉरेन्स बिश्नोई टोळीची सूत्रे हलवणाऱ्या आणखी एकाला लवकरच अटक होण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. टोळीच्या आणखी एकाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले.

सीजेपीला कसे हाताळावे हे आता समजले...

‘कॉक्रोच जनता पार्टी’ला (सीजेपी) आगामी काळात सरकारच्या अधिक कडव्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. सुरुवातीला या संघटनेला कसे हाताळायचे, हे सरकारला माहीत नव्हते; मात्र आता त्यावर तोडगा कसा काढायचा, हे सरकारला समजले आहे, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सीजेपी ही पारंपरिक राजकीय पक्षांसारखी संघटना नव्हती. ती एक नवी संघटना होती. त्यामुळे सुरुवातीला तिच्याशी कसे व्यवहार करायचे, हे आम्हाला माहीत नव्हते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)