अवकाळी पावसाने ३४,७६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित; मदत व पुनर्वसन विभागाचा १०० कोटींचा प्रस्ताव

मार्च, एप्रिल महिन्यांत राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.अवकाळी पावसामुळे राज्यात ३४,७६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून ८२ हजार ९९९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाने ३४,७६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित; मदत व पुनर्वसन विभागाचा १०० कोटींचा प्रस्ताव
Published on

मुंबई : मार्च, एप्रिल महिन्यांत राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.अवकाळी पावसामुळे राज्यात ३४,७६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून ८२ हजार ९९९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्याने दिली.

मार्च - एप्रिल २०२५ मध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना मदत देण्याविषयी सातत्याने मागणी झाल्यानंतर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात सर्वाधिक नुकसान झाले असून १०,०९५ हेक्टरवरील २६,२८७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी सुमारे २७ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कोकणातही ३,१८८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ९,२५९ शेतकरी नुकसानग्रस्त झाले असून त्यांना अकरा कोटी रुपयांची मदत प्रस्तावित आहे. तर पुणे महसूल विभागात २,६९२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले अजून १२,२२९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सात कोटी ४१ लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे. अवकाळीमुळे राज्यात ३४ हजार ७६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे समोर आले असून ८ हजार ८२ हजार ९९९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे १०० कोटी रुपयांची मदत देण्याचे प्रस्तावित असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in