सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गावरील प्रवाशांना दिलासा; प्रति वर्षासाठी ३,२४० रुपये तुटीचा निधी देणार; मंत्रिमंडळाची मंजूरी

सामान्य लोकांना खिशाला परवडेल असा विमान प्रवास करता यावा यासाठी उडान योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गावरील प्रवाशांना दिलासा; प्रति वर्षासाठी ३,२४० रुपये तुटीचा निधी देणार; मंत्रिमंडळाची मंजूरी
Published on

मुंबई : सामान्य लोकांना खिशाला परवडेल असा विमान प्रवास करता यावा यासाठी उडान योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट ३ हजार २४० रुपये तुटीचा निधी (व्हायाबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस दर आसनामागे हा व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता १७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे २० टक्के व्यावहारिकता तूट (व्हीजीएफ) देण्यात येणार आहे.

सामान्य नागरिकांना परवडणारा विमानप्रवास

केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठी ही योजना लागू होणार आहेत. ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन ३ हजार २४० रुपये दराने (शंभर टक्के व्हिजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in