विधानपरिषद निवडणुकीवरून शिवसेना उबाठा-कॉंग्रेसमध्ये बिनसलं, उद्धव ठाकरेंवर नाना पटोले नाराज? म्हणाले, "त्यांनी परस्पर..."

महाराष्ट्रात २६ जून रोजी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र त्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
विधानपरिषद निवडणुकीवरून शिवसेना उबाठा-कॉंग्रेसमध्ये बिनसलं, उद्धव ठाकरेंवर नाना पटोले नाराज? म्हणाले, "त्यांनी परस्पर..."

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीनं राज्यात घवघवीत यश मिळवलं. काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीनही पक्षांनी दमदार कामगिरी करत ३० जागांवर विजय मिळवला. आता मविआनं विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं असून २८८ पैकी १८५ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. विधानसभा निवडणूकांपूर्वी महाराष्ट्रात २६ जून रोजी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र या निवडणूकीत उमेदवार निवडीवरून महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील आपले उमेदवार कायम ठेवावेत मात्र नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार मागे घ्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

ठाकरेंनी उमेदवार मागे घ्यावेत: नाना पटोले

शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेच्या चारही जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. यावरून महाविकास आघाडीच बिघाडीची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील आपले उमेदवार कायम ठेवावेत. परंतु नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार मागे घ्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

नाना पटोले म्हणाले की, “उद्धव ठाकरे लंडनला गेले होते. त्यावेळी त्यांना फोन केला होता. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की विधान परिषदेच्या दोन जागा आम्ही लढतो. दोन जागा तुम्ही लढा. त्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं की तुमचे उमेदवार कोण आहेत? त्यानंतर मी त्यांना उमेदवारांची नावं सांगितली. यानंतर त्यांनी आमच्या नाशिकच्या उमेदवाराला बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून तिकीट जाहीर केलं”, असं म्हणत नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.

परंपरागत पद्धतीनं जागा जाहीर केल्या-अंबादास दानवे

दरम्यान काँग्रेसच्या नाराजीवरून शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने या 4 मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. सामंजस्याने बोलणी करून तोडगा काढला जाईल. या चार जागा परंपरागत पद्धतीने जाहीर केल्या आहेत, याठिकाणी काँग्रेसचा प्रभाव कमी आहे, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in