

मुंबई : ग्रामपंचायत नमुना ८ दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका देण्यासह सनद फी माफ करण्याची असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केली. याबाबत ग्रामविकास विभागाने प्रस्ताव तयार करून त्याची मंजुरी घ्यावी, असेही ते म्हणाले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मालमत्तांचे वाद मिटण्यास मदत होणार असून, नागरिकांना आपल्या मालमत्तेचा कायदेशीर हक्क मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने राज्यातील २३ हजार ग्रामपंचायतींच्या ३९ लाख मालमत्तांची अद्यावत उपकरणांद्वारे मोजणी केली आहे त्यामुळे मिळकत पत्रिका देण्याची प्रक्रिया जलद होऊ शकेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
कोकण विभागीय आयुक्तालयात बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवर व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.