मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आता कोलंबिया पॅटर्नचा अभ्यास करणार आहे. कोलंबियाचे पथक आज (शनिवारी) मुंबईत येणार असून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह धारावीतील काही भागांची पाहणी करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आता कोलंबिया पॅटर्नचा अभ्यास करणार आहे. कोलंबियाचे पथक आज (शनिवारी) मुंबईत येणार असून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह धारावीतील काही भागांची पाहणी करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.

नवी मुंबई येथील आयुक्तांच्या निवासस्थानी १५० मतदारांची नोंदणी असा आक्षेप विरोधकांनी घेतला. परंतु यात तथ्य नसून नवी मुंबई आयुक्त निवास हे परिसराचे नाव म्हणून आपण दिले होते. त्यामुळे अशा पद्धतीने त्यावर आक्षेप घेणे योग्य नाही. तसेच सुलभ शौचालयात देखभाल करणारे कुटुंब वास्तव्यास असल्याने त्यांची मतदार नोंदणी सुलभ शौचालय या पत्त्यावरच झाली होती, असे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.

राज्यातील मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया देशात काय तंत्रज्ञान वापरले जाते, याचा अभ्यास करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. कोलंबियाचे पथक शनिवारी मुंबईत येणार असून ते धारावीतील काही भागांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत मतदार वाढले कसे असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.

... म्हणून कोलंबिया पद्धतीचा अभ्यास

राज्यातील मतदार याद्यांबाबत असलेले आक्षेप दूर करण्यासाठी आयोगाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. दुबार मतदारांना शोधून त्यांची नावे कमी करणे अथवा निश्चित करणे याची कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र दुबार मतदार अथवा बोगस मतदार नोंद होणार नाही, यासाठी आता कोलंबियाच्या पद्धतीचा अभ्यास करण्याबाबत आयोगाकडून विचार सुरू आहे. तसे झाल्यास मतदार याद्यांमध्ये सुसूत्रता येणार आहे.

जन्म-मृत्यू हे मतदार यादीशी संलग्न

कोलंबिया येथे जन्म आणि मृत्यू याची सरकारकडे असलेली नोंद मतदार यादीशी संलग्न करण्यात आली आहे. यामुळे अठरा वर्षे पूर्ण होताच तरुण-तरुणींना मतदार म्हणून ओळखपत्र मिळते. त्यासाठी अर्जाद्वारे कोणतीही मागणी करावी लागत नाही. तसेच एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याचे नाव आपोआप मतदार यादीतून वगळण्यात येते. त्यामुळे दुबार मतदार नोंदणी होत नाही. तसेच मृत झाल्यानंतरही मतदाराचे नाव यादीत राहत नाही. ही पद्धत आपल्याकडे वापरता येते का याबाबत चाचणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पथक करणार पाहणी

कोलंबियाचे एक पथक भारताच्या दौऱ्यावर असून हे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. शनिवारी हे पथक राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची भेट घेणार असून यावेळी मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत अधिक चर्चा होणार आहे. तसेच धारावी विभागांमध्ये कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवण्यात आली याबाबतची माहिती घेऊन हे पथक पाहणी करणार असल्याचेही चोक्कलिंगम यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in