
नवी दिल्ली : निवडणूक विश्लेषक आणि लोकनीती-सीएसडीएसचे (सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) समन्वयक संजयकुमार यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीबाबत केलेल्या वादग्रस्त दाव्यांसाठी माफी मागितली आहे. ज्यामुळे काँग्रेसला निवडणूक आयोगावर हल्ला चढवण्याची संधी मिळाली होती ते आपले जुने ट्विट संजयकुमार यांनी डिलीट केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय कुमार यांच्या या ट्विटचा आधार घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते.
संजय कुमार यांनी आपल्या डिलीट केलेल्या ट्विटमध्ये दावा केला होता की, महाराष्ट्रातील रामटेक विधानसभा मतदारसंघ क्रमांक ५९ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान ४,६६,२०३ मतदार होते, तर विधानसभा निवडणुकीत ही संख्या २,८६,९३१ वर आली, म्हणजेच ३८ टक्के मतदार कमी झाले. तसेच, देवळाली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ४,५६,०७२ मतदार होते, तर विधानसभा निवडणुकीत ही संख्या २,८८,१४१ इतकी झाली. म्हणजेच ३६ टक्के मतदार कमी झाले. या आकडेवारीचा आधार घेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीत गडबड झाल्याचा आरोप केला होता.
संजय कुमार यांनी माफी मागताना सांगितले की, त्यांच्या डेटा विश्लेषणात चूक झाली होती. आमचा कोणतीही गैरमाहिती पसरवण्याचा हेतू नव्हता. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आकड्यांची तुलना करताना चूक झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचा पलटवार
संजय कुमार यांच्या माफीनाम्याने भाजपला काँग्रेसवर हल्ला चढवण्याची संधी मिळाली. भाजपचे आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी यावर टीका करताना म्हटले, प्रत्येक निवडणुकीत असेच होते. आधी भाजप हरत असल्याचा दावा केला जातो आणि जेव्हा निकाल उलट येतात, तेव्हा भाजप कशी जिंकली याची चर्चा सुरू होते. सीएसडीएससारख्या संस्थांनी तपास न करता आकडेवारी जाहीर केली, ज्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात खोटे आरोप करण्याची संधी मिळाली. त्यांनी पुढे म्हटले की, राहुल गांधी ज्या संस्थांवर विश्वास ठेवतात, त्या संस्थांनीच आता आपली चूक मान्य केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.