

मुंबई : परतीच्या पावसानेही निराशा केल्याने राज्यातील जवळपास २ हजार गावे आणि वाडयांना सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर १० जिल्ह्यांमधील ४१८ गावे आणि १ हजार ५६८ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी एकूण ४७९ टँकर धावत असून त्यापैकी १० शासकीय तर ४६९ खासगी टँकर आहेत.
पाणीटंचाईची स्थिती प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरमुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार ७ ते १३ सप्टेंबर दरम्यान राज्यातील ३६२ गावे आणि १ हजार ३५४ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यावेळी ४११ टँकर कार्यरत होते. त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजेच १४ ते २० सप्टेंबर या काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या ३६२ वरून ४१८ वर पोहोचली, म्हणजेच ५६ गावांची वाढ झाली आहे. तसेच टँकरवर अवलंबून असलेल्या वाड्यांची संख्याही २१४ ने वाढून १ हजार ५६८ झाली आहे. मात्र, एकूण टँकरची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत ४११ वरून ४७९ वर आली आहे. यामध्ये शासकीय टँकरची संख्या १० इतकीच असून खासगी टँकरची संख्या वाढलेली आहे.
मराठवाड्याला टंचाईची झळ
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये टँकरची मागणी कायम आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल तसेच अन्य स्थानिक जलस्रोतांमधील उपलब्ध पाण्यावर मोठा ताण आला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
प्रशासनासमोर आव्हान पाणीपुरवठ्याचे
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील काही भागांतही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही टंचाईग्रस्त गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी देण्यात येत आहे. प्रशासनासमोर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान असून आता परतीच्या पावसाने ओढ दिली तर टंचाईग्रस्त गावांची संख्या वेगाने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.