

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील ‘सुलतान’ या ट्रॉलर नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली. २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री देवगडसमोरील समुद्रात ही नौका जप्त करण्यात आली असून, तांडेलसह सात खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुणगे किनाऱ्यापासून पाच ते सहा नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. गस्ती नौका दिसताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. ‘सुलतान’चा परवाना केवळ विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (EEZ) वैध असल्याची माहिती विभागाने दिली. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारीचा अधिकार नसतानाही नौका येथे मासेमारी करत असल्याचे समोर आले आहे.