महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; जळगावात नीचांकी ८ अंश तापमानाची नोंद

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अकवान’ वादळाने शुक्रवारी सकाळी दक्षिण ओदिशातील गोपाळपूर किनारपट्टीजवळ ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांसह धडक दिली...
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; जळगावात नीचांकी ८ अंश तापमानाची नोंद
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; जळगावात नीचांकी ८ अंश तापमानाची नोंदप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अकवान’ वादळाने शुक्रवारी सकाळी दक्षिण ओदिशातील गोपाळपूर किनारपट्टीजवळ ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांसह धडक दिली. मात्र, जमिनीवर येण्यापूर्वीच वादळाची तीव्रता कमी झाली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. या वादळाच्या प्रभावामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओदिशामध्ये मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वादळाच्या जमिनीवर धडकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. समुद्रातील थंड पाणी आणि जमिनीवरील थंड वाऱ्यांमुळे वादळाला अपेक्षित तीव्रता मिळाली नाही. गोपाळपूर किनारपट्टीजवळ धडकल्यानंतर त्याचा वेग आणि प्रभाव आणखी कमी झाला. ओडिशाच्या किनारपट्टी भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला.

अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे आणि विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली. प्रशासनाने नागरिकांचे आधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याने मोठी जीवितहानी टळली.

पश्चिम बंगाल, बिहारमध्येही पावसाची शक्यता

वादळाची तीव्रता कमी झाली असली, तरी त्याच्या प्रभावामुळे छत्तीसगड, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, नागालँड आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

थंडीसोबत धुक्याचे प्रमाणही वाढणार

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढत असून, शुक्रवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत गारठा वाढला आहे. वादळाच्या प्रभावामुळे उर्वरित महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभरात महाराष्ट्रासह मध्य, उत्तर आणि वायव्य भारतात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)