मुंबई : सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. आता परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही जोरदार पाऊस सुरू झाल्याने हातचे पीक जाते की काय? अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात उत्पन्न झाली आहे. अशातच राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील विविध भागात पुढील ३ ते ४ दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे आणि रायगड येथे आज (दि. २५) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वाशिम जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील वाशिम (ऑरेंज अलर्ट) वगळता अन्य सर्वच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठीही येलो अलर्ट आहे.
तसेच, गुरूवारी (दि. २६) पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नाशिक आणि ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा आहे. शुक्रवारीही पुणे, नाशिक, पालघरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी फळबागा धोक्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी खरीपची पिकेही पाण्यात गेली आहेत.