रूचा खानोलकर/मुंबई: गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पडणारा पाऊस राज्यात येते पाच दिवस मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांचा तपशीलवार अंदाज हवामान खात्याने जारी केला.
राज्याच्या विविध भागांत अतिमुसळधार पाऊस पडणार असून जोरदार वारे वाहणार आहेत. नागरिक व प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज असल्याचे हवामान खात्याने सांगितले. जूनपासून आतापर्यंत सांताक्रुझ हवामान केंद्राने २०५२ मिमी पाऊस, तर कुलाबा केंद्राने १९१२ मिमी पाऊस नोंदवला आहे.
मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सातारा जिल्ह्याला रेड ॲॅलर्ट दिला आहे, तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. मुंबई व आठ अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मुंबईला पावसाने झोडपले
काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार कोसळत झोडपून काढले. सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले. रस्ते वाहतूक मंदावल्याने काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली. सकाळी रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने साचलेले पाणी ओसरले.
शनिवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने जोरदार कोसळण्यास सुरुवात केली. कुर्ला एलबीएस मार्गावर पाणी साचले. चेंबूर शेल कॉलनी, मानखुर्द, सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी, वडाळा, लालबाग, परळ, दादर टी.टी., भायखळा, भांडुप, पवई, मुलुंड, कांजूरमार्ग, घाटकोपर, अंधेरी सबवे येथे काही प्रमाणात पाणी साचले. मात्र दुपारनंतर पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पाणी ओसरले. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हवामान विभागाने काही तासांत पश्चिम आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेची आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. पाणी भरणाऱ्या ठिकाणी अतिरिक्त पंपांची व्यवस्था केली होती.
ठाण्यात जोरदार पाऊस कोसळला
मुंबईत सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे ३७.८ मिमी सांताक्रुझ ४७.१ मिमी पावसाची नोंद झाली, तर दहिसर (३२ मिमी), राममंदिर (५०.५ मिमी), विक्रोळी (५८.५ मिमी), चेंबूर (३२ मिमी), शीव (७८ मिमी), माटुंगा (५७ मिमी) पावसाची नोंद झाली.
राज्याच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा!
सध्या मोसमी वारे सक्रिय झाल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. तर, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे तसेच पश्चिम बंगालजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्रलगत वाऱ्यांची चक्राकार स्थिती कायम आहे आणि दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस
येत्या २४ तासांत राज्याच्या किनारपट्टी भागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी घरात राहावे. तसेच गरज नसताना प्रवास करू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.