मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? विरोधकांचा सरकारला सवाल

मुंबई ते थेट गोवा प्रवास करता यावा यासाठी १७ वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. मात्र १७ वर्षें होत आले तरी रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे...
मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? विरोधकांचा सरकारला सवाल
Published on

मुंबई : मुंबई ते थेट गोवा प्रवास करता यावा यासाठी १७ वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. मात्र १७ वर्षें होत आले तरी रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे गोवा, कोकणात जाणाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो, असा सवाल विक्रम काळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत उपस्थित केला. काळे यांच्या तारांकित प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी योग्य उत्तरे न दिल्याने विरोधकांनी सरकारचा निषेध करीत तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच सरकारच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करीत सभात्याग केला. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी परिषदेचे कामकाज एक तासासाठी तहकूब केले.

महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणारा आणि कोकण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. इंदापूर ते झाराप या आराखड्यास जून २०१३ मध्ये केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली. यानंतर ८० ते ९० टक्के संपादित जागा ताब्यात घेतली असून यावर आतापर्यंत ३३७४.११ कोटींचा खर्च झालेला असून यातील ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत सरकारने सविस्तर माहिती द्यावी आणि संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी केव्हा सुरू करणार हे स्पष्ट करावे अशी मागणी करण्यात आली. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेले उत्तर दिशाभूल करणारे असल्याचे सांगत विरोधकांनी आक्षेप घेतला. सरकारला प्रश्नच विचारायचे नाही का, असा सवाल केला. यावेळी गदारोळामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.

डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होणार

या मार्गाचे काम वेगाने करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आलेले आहेत. हे काम प्रगतिपथावर आहे. सर्व कामे डिसेंबर २०२४ अखेर पूर्ण करणार असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. टप्प्यांचा विचार करता बहुतांशी टप्प्यांचे काम ८५ ते ९० टक्के झाले असल्याचे चव्हाण म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in