वन्यप्राणी हल्ले रोखा, महसूलमंत्र्यांचा आदेश; दैनिक `नवशक्ति'च्या बातमीची दखल

वाघ, बिबट्या, रानडुकरे, कोल्हे, तरस, रानगवा आदी प्राण्यांचा लोकवस्ती वावर वाढला असून मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाच वर्षांत ४०३ लोकांचा मृत्यू झाला. तर २१ हजार ५८३ जनावरांचा फडशा पाडला, या आशयाची बातमी दैनिक `नवशक्ति' त १ जून रोजी प्रसिद्ध झाली होती.
वन्यप्राणी हल्ले रोखा, महसूलमंत्र्यांचा आदेश; दैनिक `नवशक्ति'च्या बातमीची दखल
Published on

मुंबई : वाघ, बिबट्या, रानडुकरे, कोल्हे, तरस, रानगवा आदी प्राण्यांचा लोकवस्ती वावर वाढला असून मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाच वर्षांत ४०३ लोकांचा मृत्यू झाला. तर २१ हजार ५८३ जनावरांचा फडशा पाडला, या आशयाची बातमी दैनिक `नवशक्ति' त १ जून रोजी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनेत निष्काळजीपणा झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार परिणय फुके, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी यापूर्वीही सूचना दिल्या होत्या. निधीची कमतरता असेल तर जिल्हा नियोजन आराखड्यामधून पैसे उपलब्ध करुन दिले जातील, तरीही अधिकाऱ्यांनी ते गांभीर्याने घेतलेले नाही. आता तातडीने आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबत मुख्य सचिवांच्या समितीकडे प्रस्ताव दाखल करण्यात यावा. तातडीने निधीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सूचना काय?

  • राज्यात वाढणारी वाघांची संख्या नियंत्रित करण्यासाठी दुसऱ्या राज्यांना वाघ देण्याची व्यवस्था आहे, याबाबतही विचार करण्यात यावा

  • मानवी वस्तीत वन्य प्राण्याचा शिरकाव होऊ नये यासाठी सौर कुंपन करण्यात यावे

  • वन्य प्राण्यांच्या हालचालीबाबत ग्रामस्थांना आधुनिक तंत्राच्या माध्यमातून सूचना देण्याची व्यवस्था करण्यात यावी

मृत्यूनंतर भरपाई दिली जाते पण कोणाचाही जीव परत येत नाही. त्यामुळे जंगल कमी पडत असेल तर जंगलाजवळील मोकळ्या पडलेल्या जागा वनविभागाने खरेदी कराव्यात. वन्य प्राण्यांची व्यवस्था खासगी प्राणीसंग्रहालयांत करता येईल का, यावर गंभीरपणे विचार करा. - गणेश नाईक, वनमंत्री

जंगलातील काही भाग ‘ग्रासलँड’ म्हणून विकसित करण्याचा आणि वन्य प्राण्यांना त्यांच्या अधिवासातच उपजीविकेची सोय करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याचबरोबर, वन्य हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबातील वारसाला तातडीने शासकीय नोकरी देण्याचे आदेश देण्यात यावेत. - आशीष जयस्वाल, राज्यमंत्री, वित्त, नियोजन, कृषी व मदत पुनर्वसन

जंगल परिसरात एआय कॅमेरे बसवा! वन मंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला असून वन्यजीव व मानवी संघर्षात वाढ झाली आहे. भविष्यात वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी जंगला जवळील बफर झोनमधील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असणारे अद्ययावत कॅमेरे बसवण्यात यावेत. वन्य प्राण्यांची माहिती गावकऱ्यांना मिळावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. यासाठी राज्य शासनाच्या मार्वल या संस्थेची मदत घेण्यात यावी. येत्या पंधरा दिवसांत ही कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश गणेश नाईक यांनी दिले.

विदर्भात विविध ठिकाणी होणाऱ्या मानव व वन्य जीव संघर्ष व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जायस्वाल, आमदार परिणय फुके, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मानव व वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण होऊ नये, अशा घटनांमध्ये मानवांचा मृत्यू होऊ नये, यासाठी ठोस पावले उचलावीत. वन क्षेत्रा जवळील गावांमध्ये फेन्सिंग करणे, चर खोदणे यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करा, असेही निर्देश त्यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in