प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्रपीटीआय

सांभाळा, थंडी पुन्हा वाढतेय! मुंबईसह राज्यात हुडहुडी वाढली

नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील विविध भागात गुलाबी थंडी नागरिकांना अनुभवता आली. मात्र, डिसेंबर महिन्यापासून ढगाळ वातावरण व बेमोसमी पावसामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा परतली असून राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा १० अंशांपेक्षाही खाली घसरला आहे. त्यामुळे स्वेटर, जॅकेट खरेदीकडे लोकांची पावले पडू लागली आहेत.
Published on

मुंबई : नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील विविध भागात गुलाबी थंडी नागरिकांना अनुभवता आली. मात्र, डिसेंबर महिन्यापासून ढगाळ वातावरण व बेमोसमी पावसामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा परतली असून राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा १० अंशांपेक्षाही खाली घसरला आहे. त्यामुळे स्वेटर, जॅकेट खरेदीकडे लोकांची पावले पडू लागली आहेत.

दक्षिण-पूर्व-पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मंगळवारपासून १३ डिसेंबरपर्यंत दक्षिणेकडील राज्यात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. रात्रीचा पारा ४ अंश सेल्सिअसने खाली आला असून तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.

फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असून मुंबईतदेखील तापमान कमी होणार आहे. पुढील ३ दिवसांत किमान तापमानात घट होऊन मुंबईकरांना दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरात सोमवारी १७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर उपनगर व नवी मुंबईतही गारठा वाढायला सुरुवात झाली. नाशिकमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान हे केवळ ९ अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

निफाड तालुक्यात ६.७ अंश सेल्सिअस

फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरताच निफाड तालुक्यासह परिसरात थंडीचा तडाखा वाढला असून किमान तापमान ६.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. सध्या निफाड तालुक्यात महाबळेश्वर, लोणावळ्याप्रमाणे तापमानात मोठी घट झाली आहे. द्राक्ष पंढरीत तापमानात मोठी घट झाल्याने द्राक्ष उत्पादक मात्र चिंताग्रस्त झाले आहेत, तर थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in