
मुंबई : मुंबई, ठाणे आणि पालघर, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांसाठी भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत बुधवारी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७ मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील ४८ तास राज्यात सर्वत्र वादळी-वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. देशात जम्मू काश्मीर ते तामिळनाडूपर्यंत बुधवारपासून पाऊस कोसळणार आहे. बुधवारपासून पुढील चार दिवस पुणे जिल्ह्याला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात वीज कोसळून ३ जणांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर येथील कोडापूर येथील अशोक म्हस्के (२२), बीडमधील मगरवाडी येथील सचिन मधुकर मगर (३५) आणि बीडमधील ढोरवाडी येथील अभिमन्यू नलभे (३६) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. जालना आणि परभणी जिल्ह्यातही काही गुरे वीज पडून ठार झाल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विदर्भ आणि मराठवाड्याला मुसळधार पावसाने झोडपले असून त्यात काही ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिक, लातूर याभागात काही ठिकाणी गारपीट झाल्याने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे, तर कोकणात काही ठिकाणी पाऊस झाल्याने आंब्याचे नुकसान झाले आहे.
दोन दिवस गारपिटीचा पाऊस
बुधवारी सात मे रोजी जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना, बीड, तसेच सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्याच्या काही भागांत आज वादळी पावसाचा इशारा
७ मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. यात गारपिटीचादेखील इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्याच्या उर्वरित भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रात्री अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पालघर व ठाण्यात जोरदार वारे व मेघगर्जनेसह पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली. अचानक आलेल्या पावसाने घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली तरी उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळाला.