राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान
राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तर, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी अर्थात निकालांची घोषणा केली जाईल. प्रत्येक मतदाराला २ मते, एक मत जिल्हा परिषद व दुसरे पंचायत समितीसाठी असेल. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास सह्याद्री अतिथिगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली.
कोणत्या १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणूक?
पुणे, सातारा, सांगली, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक असेल. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर, २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. घोषणा झालेल्या सर्वच जिल्हा परिषदांचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यात पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगरपरिषदांची निवडणूक घेतली. त्यानंतर सध्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या २९ महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी अतिरिक्त मुदत मागितली होती. मात्र, कोर्टाने केवळ १५ दिवसांची मुदत देत निवडणूक कार्यक्रम १५ फेब्रुवारीपर्यंत संपवण्याचे आदेश दिले होते.
निवडणूक वेळापत्रक
१६ जानेवारी : निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार
१६–२१ जानेवारी : उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत
२२ जानेवारी : अर्ज छाननी
२७ जानेवारी (३ वाजेपर्यंत) : अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ
२७ जानेवारी (३.३० नंतर) : अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप
५ फेब्रुवारी : मतदान
७ फेब्रुवारी : मतमोजणी
