
कराड : सातारा शहराचा ऐतिहासिक वारसा आजही जतन केला जात असून साताऱ्यातील एसटी बस स्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात सध्या सौर ऊर्जावर चालणारे उपकरण बसविण्यात आले आहे. येत्या १२ मे रोजी बुद्ध जयंतीच्या निमित्त या सौर ऊर्जा उपकरणाचे उद्घाटन होत असल्याने हे वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून स्वयंप्रकाशित व्हा, असा संदेश दिला जाणार आहे.
सातारा बसस्थानक शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये गेल्या वर्षी प्रतापगड येथील शिवप्रताप इतिहास घडवणाऱ्या वाघ नखे थेट इंग्लंडमधील राणी एलिझाबेथ म्युझियम येथून मोठ्या पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात आणल्या होत्या. तेव्हापासून हे संग्रहालय सर्व शिवप्रेमींसाठी तीर्थक्षेत्र बनले होते. आता याच ठिकाणी शिवकालीन महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. लवकरच शिवप्रेमींसाठी ती खुली करण्यात येणार आहे. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्यावतीने २४० वॅट उत्पादन करणारी सौर ऊर्जा पॅनल टाकण्यात आलेली आहे. ९३ सौर ऊर्जा पॅनलमधून ५८५ वॅट वीज उत्पादन होणार आहे. याची लांबी अडीचशे फूट असून त्यामुळे स्लॅबची संरक्षण झालेले आहे.
जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या दिवशी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. वेध महिला बचत गट विपणन महामंडळाच्यावतीने पंधरा दिवसापासून पन्नास के. वी. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम झाले आहे. यामुळे दीड लाख रुपयेची वीज बिल बचत होणार आहे. जशा पद्धतीने शासकीय कार्यालयात झिरो पेंडेन्सी राबवण्यात येते त्या पद्धतीने आता शून्य वीज देयक होणार असल्याने ती एक क्रांती ठरली आहे.
महाराष्ट्रातील शासकीय कार्यामध्ये सर्वप्रथम सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी केल्याबद्दल अनेक मान्यवरांनी संग्रहालय व पुरातन विभागाचे कौतुक केले आहे. सध्या तापमान वाढीस लागलेले असून ते सौर ऊर्जेसाठी अनुकूल आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पोषक वातावरण असल्याचे तांत्रिक माहिती मिळाली आहे.